Sri Lanka Train Accident, 6 Elephants died: श्रीलंकेतील हबराना परिसरात गुरुवारी एक मोठा अपघात झाला. एका प्रवासी ट्रेनची हत्तींच्या कळपाला धडक बसली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, या अपघातात सहा हत्तींचा मृत्यू झाला. तसेच दोन जखमी हत्तींवर उपचार सुरू आहेत. श्रीलंकेतील आतापर्यंतच्या सर्वात वाईट रेल्वे अपघातापैकी एक असा हा अपघात मानला जातोय. पण रेल्वे अपघातात हत्तींचा मृत्यू होण्याची या देशातील ही पहिली वेळ नाही. याआधीही असे प्रकार घडले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की जंगलतोड आणि नैसर्गिक संसाधनांच्या कमतरतेमुळे हत्तींना आता मानवी क्षेत्रात प्रवेश करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे ते रेल्वे रुळांवर, शेतांवर आणि गावांवर येत आहेत आणि अपघातांचे बळी ठरत आहेत. रेल्वे अपघातांव्यतिरिक्त, अनेक हत्ती वीज पडून, विषारी अन्न खाऊन आणि शिकारीचे बळी ठरतात.
दरवर्षी २० हत्तींचा मृत्यू
श्रीलंकेत वाहने आणि हत्ती यांच्यातील अपघात अतिशय सामान्य मानले जावे इतक्या स्तराला येऊन ठेपले आहेत. वन्यजीव संवर्धन संघटनांच्या मते, दरवर्षी सुमारे २० हत्ती रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. याशिवाय, गेल्या वर्षी मानव विरूद्ध हत्ती यांच्यात संघर्षात १७० हून अधिक लोक आणि सुमारे ५०० हत्तींचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.
ट्रेनचालकांना दिल्या जाताहेत सूचना
वन्यजीव तज्ज्ञ आणि स्थानिक प्रशासन सतत रेल्वे चालकांना जंगले आणि हत्तींच्या कॉरिडॉरमधून जाताना ट्रेनचा वेग कमी राखण्याचे आणि हॉर्न वाजवून हत्तींना सावध करण्याचे आवाहन करत आहेत. पण हा उपाय अद्याप पूर्णपणे प्रभावी असल्याचे दिसत नाही.
याआधीही मोठे अपघात झालेत
हबराना येथील हा पहिलाच अपघात नाही. २०१८ मध्ये, त्याच भागात एका गर्भवती हत्तीणीचा आणि तिच्या दोन बछड्यांचा ट्रेनने धडकून मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, मिनेरिया भागात एका ट्रेनने हत्तींच्या कळपाला धडक दिली होती, ज्यामध्ये दोन हत्तींचा मृत्यू झाला होता आणि एक जखमी झाला होता.
श्रीलंकेत हत्तींना कायदेशीर संरक्षण
श्रीलंकेत हत्तींना विशेष कायदेशीर संरक्षण आहे. देशात सुमारे ७,००० जंगली हत्ती आहेत, जे तेथील बौद्ध समुदायाद्वारे पवित्र मानले जातात. श्रीलंकेत हत्तीला मारणे हा कायदेशीर गुन्हा आहे, ज्यासाठी तुरुंगवास किंवा मोठ्या दंडाची तरतूद आहे. असे असूनही, मानव-हत्ती संघर्षाच्या वाढत्या घटना सरकार आणि वन्यजीव तज्ज्ञांसाठी एक मोठे आव्हान ठरत आहेत.