धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:44 IST2025-12-16T12:43:49+5:302025-12-16T12:44:34+5:30
Sydney beach attackers Philippines training: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील प्रसिद्ध बोंडी बीचवर झालेल्या भीषण गोळीबारामागे पाकिस्तान वंशाचे बाप-लेक, सादिक अकरम आणि नवेद अकरम यांचा हात असल्याचे समोर आले होते.

धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील प्रसिद्ध बोंडी बीचवर झालेल्या भीषण गोळीबार प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय वळण लागले आहे. या हल्ल्यातील आरोपींनी भारतीय पासपोर्टचा वापर करून फिलिपाइन्सचा प्रवास केला होता, असा खळबळजनक दावा फिलिपिन्सच्या इमिग्रेशन ब्युरोने मंगळवारी केला आहे. तर दोन्ही आरोपी मुळचे पाकिस्तानी नागरिक असल्याचे ऑस्ट्रेलियन पोलिसांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारामागेपाकिस्तान वंशाचे बाप-लेक, सादिक अकरम आणि नवेद अकरम यांचा हात असल्याचे समोर आले होते. मात्र, नवीन दाव्यानुसार, या दोघांनी हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी म्हणजेच १ ते २८ नोव्हेंबर दरम्यान फिलिपिन्सला भेट दिली होती. हा प्रवास त्यांनी भारतीय पासपोर्टवर केला होता.
हल्लेखोरांनी फिलिपिन्समध्ये 'मिलिटरी स्टाईल' प्रशिक्षण घेतल्याचा संशय ऑस्ट्रेलियन आणि फिलिपिन्सच्या सुरक्षा यंत्रणांना आहे. हे दोघे १ नोव्हेंबर रोजी 'फिलिपिन्स एअरलाईन्स'च्या फ्लाइट PR212 ने सिडनीहून मनिला येथे आले होते. हल्ल्यानंतर जप्त केलेल्या संशयितांच्या वाहनात स्फोटके आणि 'आयसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंधित हाताने बनवलेले ध्वज आढळले आहेत.
या हल्ल्यात १५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, ख्रिसमस आणि यहुदी सण 'हनुक्का'च्या काळात हा हल्ला करून मोठी दहशत पसरवण्याचा त्यांचा हेतू होता. हल्लेखोर भारतीय पासपोर्टपर्यंत कसे पोहोचले आणि यात काही बनावट कागदपत्रांचा समावेश आहे का, याचा तपास आता आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्था करत आहेत.