तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:21 IST2025-05-21T14:20:18+5:302025-05-21T14:21:06+5:30
आर्मेनिया आणि अझरबैजान शेजारील देश असून, त्यांच्यात कट्टर वैर आहे.

तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
India-Armenia Relation : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आर्मेनियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आर्मेनियाला आकाश 1-एस क्षेपणास्त्र प्रणालीची दुसरी खेप देणार आहे. आकाश 1-एस हे जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र असून, त्याची पहिली खेप नोव्हेंबर 2024 मध्ये आर्मेनियाला देण्यात आली होती.
तुर्की अन् अझरबैजानला शह देण्याचा प्रयत्न
पाकिस्तानसोबतच्या युद्धादरम्यान, तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिल्याचे दिसून आले. आता भारताच्या निर्णयामुळे तुर्की आणि अझरबैजानची चिंता वाढणार आहे. आर्मेनिया आणि अझरबैजान शेजारील देश असून, त्यांच्यात कट्टर वैर आहे. अझरबैजान पाकिस्तान आणि तुर्की यांच्या जवळ आहे, तर आर्मेनियाचे भारताशी चांगले संबंध आहेत. 2020 पासून भारत आणि आर्मेनिया सरकारमधील संरक्षण संबंध सातत्याने वाढत आहेत. हा देश आपल्या पारंपारिक शस्त्रास्त्र पुरवठादार रशियावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
भारत सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत 2022 च्या करारांतर्गत आर्मेनियाला आकाश-1 एस जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीची दुसरी खेप पुरवण्याची योजना आखत आहे. यासोबतच, भारत आर्मेनियाला हॉवित्झर तोफा आणि पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टमसह विविध प्रकारची शस्त्रे पुरवण्याच्या योजनेवरही काम करत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया अनेक वर्षांपासून आर्मेनियाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे, परंतु आता दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये दरी दिसून येत आहे.
भारताकडून 43% शस्त्र खरेदी
युक्रेनविरुद्धच्या युद्धात आर्मेनियाने रशियाला उघडपणे पाठिंबा दिलेला नाही. रशियासोबतच्या संबंधांमध्ये दुरावा वाढत असताना आर्मेनिया भारताच्या जवळ आला असून, आता भारत त्याचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार बनला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अलीकडील अहवालानुसार, भारत हा आर्मेनियाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. अर्मेनियाने भारताकडून 2022-2024 दरम्यान त्याच्या एकूण शस्त्रास्त्र खरेदीपैकी 43% खरेदी केली.
1991 मध्ये दोन देश वेगळे झाले
सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर 1991 मध्ये आर्मेनिया आणि अझरबैजान दोन देशांची स्थापना झाली. अझरबैजान हा मुस्लिम देश आहे, तर आर्मेनियाची लोकसंख्या ख्रिश्चन बहुसंख्य आहे. नागोर्नो-काराबाखची लोकसंख्याही बहुसंख्य ख्रिश्चन आहे. असे असूनही, जेव्हा सोव्हिएत युनियन कोसळले, तेव्हा काराबाख अझरबैजानला देण्यात आला. परिसरातील लोकांनीही आर्मेनियासोबत राहण्याचे मतदान केले होते, तरीही हा परिसर अझरबैजानकडे आहे. या परिसराच्या मालकी हक्कासाठी दोन्ही देशांमध्ये वाद आहे.