रशियातून तेल घेऊन येणाऱ्या जहाजावर काळ्या समुद्रात हल्ला; मानवरहित स्ट्राईकमध्ये इंजिनलाच करण्यात आले लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 17:14 IST2026-03-26T17:12:12+5:302026-03-26T17:14:24+5:30
रशियातून तेल घेऊन येत असलेल्या एका जहाजावर हल्ला करण्यात आल्याची घटना काळ्या समुद्रात घडली आहे. बोस्फोरस सामुद्रधुनीजवळ या तेल जहाजाला लक्ष्य करण्यात आले आहे.

रशियातून तेल घेऊन येणाऱ्या जहाजावर काळ्या समुद्रात हल्ला; मानवरहित स्ट्राईकमध्ये इंजिनलाच करण्यात आले लक्ष्य
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेल-गॅसची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे आता अनेक देशांनी रशियाकडून तेल आयात करणे सुरू केले आहे. पण, काळा समुद्रही युद्ध क्षेत्र बनते की, काय अशी शंका यावी अशी घटना घडली आहे. कारण रशियातून तेल घेऊन येणाऱ्या टर्कीच्या जहाजावर हल्ला करण्यात आला आहे.
टर्कीच्या तेल जहाजावर गुरुवारी (२६ मार्च) सकाळी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. पण, या हल्ल्यामुळे या मार्गावरून होणाऱ्या तेल वाहतुकीच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
टर्कीच्या मंत्र्याने हल्ल्याबद्दल काय सांगितले?
या हल्ल्याबद्दल बोलताना टर्कीचे परिवहन मंत्री अब्दुल कादिर उरालोग्लू म्हणाले, "काळ्या सागरात आमच्या एका तेल जहाजावर मानवरहित बोटीचा वापर करून हल्ला केला गेला. मी हे सांगू शकतो की, रशियातून कच्चे तेल घेऊन येत असलेल्या आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजाने आपतकालीन नियंत्रण कक्षाला इंजिनवरच हल्ला झाल्याची माहिती दिली."
"आमचे असे म्हणणे आहे की, इंजिन रूमलाच लक्ष्य करून हा हल्ला केला गेला होता. हा हल्ला ड्रोन, नाहीतर पाण्यातून मानवरहित वाहनाने (बोट) केला गेला", असेही त्यांनी सांगितले.
हल्ला झाला तेव्हा जहाज नेमके कोठे होते?
मंत्र्यांनी सांगितले की, "खासगी समुद्र सुरक्षा कंपनी वॅनगार्ड टेकने दिलेल्या माहितीनुसार, १४०,००० टन कच्चे तेल घेऊन जहाज येत होते. बोस्फोरस सामुद्रधुनी हद्दीत प्रवेश करताना, जवळपास १५ मैल दूर उत्तरेला असताना स्फोट झाला. हे जहाज नोव्होरोस्सियस्क पोर्टवरून येत होते."
"जहाजावरील चालक दलातील सर्व २७ लोक सुरक्षित आहेत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इंजिनला निशाणा बनवून हल्ला करण्यात आला. संपू्र्ण जहाज उद्ध्वस्त करणे, हाच त्यांचा उद्देश होता", असेही उरालोग्लू यांनी सांगितले.