शरीफ हादीचे हल्लेखोर भारतात पळाले; बांगलादेशचा दावा भारताने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:56 IST2025-12-29T12:55:44+5:302025-12-29T12:56:08+5:30
मेघालय पोलिसांनी हा दावा फेटाळताना, गारो हिल्स भागात संशयित उपस्थित असल्याचा दावा पुष्टी करणारी माहिती उपलब्ध नाही, असे सांगितले.

शरीफ हादीचे हल्लेखोर भारतात पळाले; बांगलादेशचा दावा भारताने फेटाळला
ढाका : इन्किलाब मंच या युवासंघटनेचा नेता शरीफ उस्मान हादी याची हत्या करून हल्लेखोर भारतात पळाले, असा दावा बांगलादेश पोलिसांनी रविवारी येथील स्थानिक न्यायालयात केला.
हादीची १२ डिसेंबरला डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या मते, हादी याची हत्या फैसल करीम मसूद आणि आलमगिर शेख यांनी केली. हे दोघे हल्लेखोर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने हलूआघाट सीमेवरून मेघालय राज्यात घुसले; पण हे हल्लेखोर केव्हा भारतात पळाले, याची तारीख पोलिस सांगू शकलेले नाहीत.
मेघालय पोलिसांनी हा दावा फेटाळताना, गारो हिल्स भागात संशयित उपस्थित असल्याचा दावा पुष्टी करणारी माहिती उपलब्ध नाही, असे सांगितले.
हल्लेखोरांनी मेघालयात प्रवेश केल्याचा पुरावा नाही
शिलाँग : इन्किलाब मंच संघटनेचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येतील आरोपी मेघालयात दाखल झाल्याचा बांगलादेश पोलिसांचा दावा रविवारी भारताने फेटाळला. मेघालयातील सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक ओ. पी. ओपाध्याय यांनी हा दावा निराधार व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले. हलुआघाट सेक्टरमधून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कोणीही मेघालयात प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नाही. बीएसएफने अशी कोणतीही घटना नोंदवलेली नाही किंवा त्याबाबत कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही, असे ओपाध्याय यांनी पीटीआयला सांगितले.
झिया यांची प्रकृती गंभीर
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. विविध आरोग्य समस्यांशी झुंज देणाऱ्या ८० वर्षीय झिया २३ नोव्हेंबरपासून ढाका येथील ‘एव्हरकेअर’ रुग्णालयात उपचार घेत आहेत. ११ डिसेंबर रोजी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.