शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:56 IST2025-12-18T18:55:39+5:302025-12-18T18:56:15+5:30
हजारो पाकिस्तानी नागरिक सौदी अरेबिया, दुबई, कुवेतसारख्या देशांमध्ये जाऊन भीक मागतात.

शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
Pakistani Beggars : हजारो पाकिस्तानी परदेशात भीक मागण्यासाठी जातात, ही बाब सर्वश्रृत आहे. यामुळे, अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची प्रतिमा धुळीला मिळाली आहे. आता परत एकदा, याच कारणामुळे पाक सरकार तोंडावर आपटले आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातसारख्या खाडी देशांमध्ये भीक मागणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या वाढत असून, या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने 56 हजारांहून अधिक पाकिस्तानी नागरिकांची देशातून हकालपट्टी केली आहे.
सौदी-यूएईचा इशारा, पाकिस्तानवर दबाव
सौदी अरेबिया आणि यूएईने वारंवार इशारा देऊनही पाकिस्तान संघटित भीक मागणाऱ्या टोळ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसते. उमराह आणि पर्यटक व्हिसांचा गैरवापर करून मक्का-मदिना व इतर शहरांत भीक मागणारे पाकिस्तानी नागरिक आढळून येत असल्याने यजमान देशांमध्ये चिंता वाढली आहे.
66 हजारांहून अधिक प्रवाशांना उड्डाणास मज्जाव
पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA)ने 2025 मध्ये 66,154 प्रवाशांना विमानतळावरून परत पाठवले. संघटित भीक मागणारे गट आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. हे आकडे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील एका समितीसमोर सादर करण्यात आले.
यूएईकडून व्हिसा निर्बंध
गेल्या महिन्यात यूएईने बहुसंख्य पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे थांबवले. पाकिस्तानी नागरिकांकडून गुन्हेगारी कृत्ये आणि भीक मागण्याच्या तक्रारी वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. याचा फटका कायदेशीर कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरुंनाही बसत आहे.
मक्का-मदिनेत पाकिस्तानी भिकाऱ्यांमुळे लाजिरवाणी स्थिती
2024 मध्ये सौदी अरेबियाच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने इशारा दिला होता की, परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर उमराह व हज यात्रांवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, ही समस्या केवळ सौदी अरेबियापुरती मर्यादित नाही. यूएई, कुवेत, अझरबैजान, बहरीन यांसारख्या देशांतही पाकिस्तानी भिकारी आढळतात. पश्चिम आशियात अटक झालेल्या भिकाऱ्यांपैकी 90 टक्के पाकिस्तानी होते.