व्हाईट हाऊसमध्ये खोदकाम चालू, डोनाल्ड ट्रम्प का तयार करतायत हायटेक 'बंकर'; अण्वस्त्र हल्ल्यापासूनही होणार रक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:26 IST2026-03-30T11:18:38+5:302026-03-30T11:26:28+5:30
Trump Iran War Update : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बुलेटप्रूफ आणि ड्रोन-प्रूफ बॉलरूम तयार करण्यास सुरुवात केली आहे. १००० लोकांसाठी राहण्याची सोय असलेल्या या 'सुपर बंकर'ची खास वैशिष्ट्ये वाचा.

व्हाईट हाऊसमध्ये खोदकाम चालू, डोनाल्ड ट्रम्प का तयार करतायत हायटेक 'बंकर'; अण्वस्त्र हल्ल्यापासूनही होणार रक्षण
पश्चिम आशियातील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. इराणकडून अमेरिकेवर संभाव्य हल्ल्याची भीती वर्तवली जात असताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सुरक्षेसाठी व्हाईट हाऊसमध्ये एका अत्यंत सुरक्षित अशा 'अंडरग्राउंड सेफ हाऊस' ची निर्मिती केल्याचे वृत्त समोर येत आहे.
हे बंकर व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगमध्ये बनवण्यात येत असून ते अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. हे केवळ एक सुरक्षित ठिकाण नसून, अण्वस्त्र हल्ला किंवा रासायनिक हल्ल्याच्या वेळीही राष्ट्राध्यक्षांना पूर्ण सुरक्षा प्रदान करेल अशा पद्धतीने याचे डिझाइन करण्यात आले आहे. याला 'प्रेसिडेंशियल इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटर'च्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
बंकरची गरज का भासली?
इराणने नुकतेच अमेरिकन तळांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले आहेत. प्रत्युत्तर म्हणून ट्रम्प यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने युद्धाचा धोका वाढला आहे. युद्धजन्य परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या मुख्य टीमला सुरक्षित ठिकाणाहून कारभार चालवता यावा, यासाठी हे बंकर तयार करण्यात आले आहे. या बंकरमधून ट्रम्प अमेरिकन लष्कराला थेट आदेश देऊ शकतात आणि जगातील घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात.
युद्ध की चर्चा?
एकीकडे ट्रम्प इराणसोबत पडद्यामागून चर्चा करत असल्याचे सांगत असले, तरी दुसरीकडे व्हाईट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या मोठ्या सुरक्षा तयारीमुळे अमेरिका कोणत्याही मोठ्या संघर्षासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
खर्च खाजगी देणगीतून, सरकारी तिजोरीला भार नाही
या प्रकल्पावरून अमेरिकेत राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण झाला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना ट्रम्प म्हणाले की, या 'सेफ हाऊस'साठी लागणारा सर्व खर्च खाजगी देणगीदारांकडून उभा केला जात असून, यात सरकारी पैसा वापरला जाणार नाही. हा प्रकल्प निर्धारित वेळेच्या आधी आणि कमी बजेटमध्ये पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
१००० लोकांसाठी राहण्याची सोय
व्हाईट हाऊसच्या खाली बनत असलेल्या या लष्करी संकुलात एकाच वेळी १००० लोक राहू शकतील. येथे केवळ राष्ट्राध्यक्षांची सुरक्षाच नाही, तर टॉप लेव्हल लष्करी बैठका आणि मोठे समारंभ आयोजित करण्याची सोय असेल. या 'मिलिट्री फॅसिलिटी'बद्दलची अधिक माहिती गोपनीय ठेवण्यात आली असून, २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.