ऐकावं ते नवल! शास्त्रज्ञांनी शोधला लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 13:44 IST2018-08-07T13:44:09+5:302018-08-07T13:44:16+5:30
विज्ञानाच्या जगात अनेक चित्रविचित्र शोध लागत असतात. आतातर शास्त्रज्ञांनी चक्क लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस शोधून काढला आहे.

ऐकावं ते नवल! शास्त्रज्ञांनी शोधला लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस
न्यूयॉर्क - विज्ञानाच्या जगात अनेक चित्रविचित्र शोध लागत असतात. आतातर शास्त्रज्ञांनी चक्क लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस शोधून काढला आहे. त्यामुळे आता लठ्ठपणा कमी करण्यासाठीची लस तयार करणे शक्य होणार आहे.
गेल्या काही काळात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बदललेली जीवनपद्धती आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी लठ्ठपणा वाढवण्यास कारणीभूत ठरतात, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र शास्त्रज्ञांनी लठ्ठपणा वाढवणारा व्हायरस शोधून काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शास्त्रज्ञांनी लठ्ठपणा आणि संसर्गजन्य आजार परसवणाऱ्या व्हायरसमधील परस्पर संबंध असल्याचे पुरावे शोधून काढले आहेत.
शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामध्ये ज्या रुग्णांचे वजन सामान्य असते त्यांच्या तुलनेत लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांच्या शरीरात एडनोव्हायरस-36 चार पटीने अधिक असल्याचे समोर आले. तसेच प्राण्यांवर करण्यात आलेल्या परीक्षणात हा व्हायरस शरीरातील लठ्ठपणा 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले.
हा व्हायरस शरीरावर दुहेरी परिणाम करतो. एकीकडे हा व्हायरस फॅट सेल्समध्ये उत्तेजना निर्माण करतो. त्यामुळे शरीरात जळजळ आणि सूज येते. तर दुसरीकडे हा व्हायरस मृत पेशींना शरीराबाहेर जाण्यापासूनही रोखतो. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामध्ये लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या एकूण 30 टक्के व्यक्तींना या व्हायरसची लागण झाल्याचे आले. तर 11 टक्के व्यक्तींमध्ये एडनोव्हायरस-36 असल्याचे समोर आले. दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ मॅच्युसिट्सचे डॉ. विल्मोर वेब्ले सांगतात की, श्वसनासंबंधीचे आजार परसण्यासाठी जबाबदार असणाऱ्या एडनोव्हायरससाठी लस बनवून अमेरिकन लष्कर त्याचा वापर करत आहे. त्यामुळे लठ्ठपणा वाढवणाऱ्या या व्हायरसला रोखण्यासाठी लस तयार करणे शक्य आहे, असा निष्कर्ष निघतो."