Saudi Arabia excludes POK from Pakistan's map | सौदी अरेबियाने पाकच्या नकाशातून पीओके वगळले 

सौदी अरेबियाने पाकच्या नकाशातून पीओके वगळले 

लंडन : सौदी अरेबियानेपाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर (पीओके), गिलगिट आणि बाल्टिस्थानला हटविल्याची माहिती (पीओके) कार्यकर्ते अमजद अयुब मिर्जा यांनी नुकतीच दिली. त्यांनी हे सांगताना नकाशाचा फोटो ट्वीट करीत त्यावर लिहिले आहे की, सौदी अरेबियाकडूनभारताला दिवाळीची भेट, पाकिस्तानच्या नकाशातून गिलगिट, बाल्टिस्थान आणि काश्मीरला हटविले. 

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१-२२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने सौदी अरेबियाने २० रियालची एक बँकनोट जारी केली आहे. या नोटेवर छापलेल्या जगाच्या नकाशात गिलगिट, बाल्टिस्थान आणि काश्मीर हे प्रदेश पाकिस्तानात दाखविण्यात आलेले नाहीत. या नोटेच्या एका बाजूला सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज यांचे छायाचित्र आणि एक घोषणा आहे. असे करून सौदीने पाकिस्तानला अपमानित केले आहे, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने १५ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या तथाकथित गिलगिट-बाल्टिस्थान विधानसभा निवडणुकांबाबत तीव्र आक्षेप सप्टेंबर महिन्यातच नोंदविला होता. गिलगिट, बाल्टिस्थान यांच्यासह जम्मू-काश्मीर, तसेच लडाख हे भारताचे अविभाज्य घटक असल्याचे पुन्हा एका ठणकावून सांगितले होते. 

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकचा नवा नकाशा जारी करून त्यात जम्मू आणि काश्मीर, लडाख, जुनागढ, गुजरातमधील खाडी आणि मानावदर या प्रदेशांवर दावा सांगितला होता.  जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्दबातल केल्याच्या वर्षपूर्तीवेळी पाकिस्तानने असे करून आपला जळफळाट व्यक्त केला होता. (वृत्तसंस्था)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saudi Arabia excludes POK from Pakistan's map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.