जगात कुठेही अस्तित्वात नसलेला एक माणूस जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. या व्यक्तीचं नाव आहे सातोशी नाकामोतो. हा सातोशी नाकामोतो तोच आहे ज्याला बिटकॉईन या जगातील सर्वात मौल्यवान क्रिप्टोकरंसीचा जनक मानलं जातं. मात्र तो कोण आहे, कसा आहे, तो कसा दिसतो, तो खरोखरच अस्तित्वात आहे की त्याचं अस्तित्व हे केवळ काल्पनिक आहे याबाबत कुणालाही फारशी माहिती नाही. मात्र आता तो जगातील बारावा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. तसेच त्याच्याकडे बिटकॉईच्या नव्या मूल्यानुसार १२८ अब्ज डॉलरपेक्षा अधिकची संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे.
सातोशी नाकामोतो नावाने ओळख असलेल्या या व्यक्तीने २००८ मध्ये बिटकॉईनची श्वेतपत्रिका काढली होती. तसेच २००९ मध्ये पहिलं बिटकॉईन माईन केलं होतं. आता सुमारे दीड दशकानंतर सातोशी नाकामोतोकडे १२८.९२ अब्ज डॉलर (अंदाजे ११ लाख कोटी रुपये) एवढी संपत्ती गोळा झाली आहे. तसेच तो जगातील बारावा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. क्रिप्टो एक्सचेंज बिटस्टॅम्पनुसार नाकामोतोकडे अंदाजे १०.९६ लाख बिटकॉईन आहेत. याची किंमत मायकल डेलच्या १२४.८ अब्ज डॉलर संपत्तीपेक्षा अधिक आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या मोठ्या क्रिप्टो करंसीच्या साम्राज्यामागे कोण आहे, हे मात्र एक रहस्यच बनलेलं आहे.
दरम्यान, सातोशी नाकामोते याची ओळख पटवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले गेले. मात्र त्यात फारसं यश आलं नाही. नाकामोतो हा २०११ पर्यंत ऑनलाईन अॅक्टिव्ह होता. मात्र नंतर तो अचानक गायह झाला. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार नाकामोता हा जपानमधील एक ३७ वर्षीय व्यक्ती होता. मात्र तो जेव्हा ऑनलाईन असायचा तेव्हा त्याची वेळ ही युनायटेड किंग्डममधील प्रमाण वेळेशी मिळतीजुळती होती. तसेच त्याने लिहिलेले कोड पाहिले असता तो C++ प्रोग्रॅमिंगच्या भाषेमध्ये तज्ज्ञ होता असे दिसून येते.
त्याशिवाय मार्च २०२५ मध्ये सातोशी नाकामोतो यायावर छापण्यात आलेल्या एका पुस्तकाचे लेखक बेंजामिन वालेस यांनी त्याचा उल्लेख एक अशी व्यक्ती जी अस्तित्वात असेल किंवा नसेल, असा केला होता. त्यामुळे सातोशी नाकामोतो याचं नाव जगातील श्रीमंतांच्या यादीत असलं तरी त्याची ओळख अद्याप गुढ बनलेली आहे.