ट्रम्प यांच्यासाठी नोबेलचा त्याग, पण बदल्यात काय मिळालं? व्हेनेझुएलाच्या 'त्या' महिला नेत्याला मोठा झटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:08 IST2026-01-07T11:07:43+5:302026-01-07T11:08:30+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना मोठा धक्का दिला आहे.

ट्रम्प यांच्यासाठी नोबेलचा त्याग, पण बदल्यात काय मिळालं? व्हेनेझुएलाच्या 'त्या' महिला नेत्याला मोठा झटका!
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना मोठा धक्का दिला आहे. ज्या मचाडो यांनी काही महिन्यांपूर्वीच आपले नोबेल पारितोषिक ट्रम्प यांना समर्पित केले होते, त्यांनाच आता ट्रम्प यांनी नेतृत्वासाठी 'अपात्र' ठरवले आहे. यामुळे जागतिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अमेरिकन स्पेशल फोर्सेसने मध्यरात्री व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये धडक कारवाई करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले. या सत्तापालटानंतर व्हेनेझुएलाची धुरा आता मारिया कोरिना मचाडो यांच्याकडे येईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. "त्यांच्यासाठी व्हेनेझुएलाची परिस्थिती हाताळणे कठीण जाईल, देशात त्यांना फारसा पाठिंबा किंवा आदर नाही," असे रोखठोक विधान करत ट्रम्प यांनी मचाडो यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
मचाडो यांचा 'एकतर्फी' पाठिंबा
५८ वर्षांच्या मारिया कोरिना मचाडो गेल्या दोन दशकांपासून मादुरो यांच्या प्रखर विरोधक आहेत. २०२३ मध्ये त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची निवडणूक जिंकली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हा त्यांनी, "या पुरस्काराचे खरे मानकरी डोनाल्ड ट्रम्प आहेत, मी हे सन्मान त्यांना समर्पित करते," असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अनेक वर्षांपासून त्या ट्रंप यांच्या कट्टर समर्थक राहिल्या आहेत, पण ऐनवेळी ट्रम्प यांनी त्यांनाच बाजूला केले आहे.
ट्रम्प यांनी का फिरवली पाठ?
मचाडो यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, "त्या एक चांगल्या महिला आहेत, पण व्हेनेझुएलाच्या अंतर्गत राजकारणात त्यांचा दबदबा नाही. त्या ही परिस्थिती सांभाळू शकत नाहीत." ट्रम्प यांच्या या विधानामुळे मचाडो समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी असून, हा एक प्रकारे राजकीय विश्वासघात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
संघर्षाचा इतिहास
२०२४ ची राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवण्यापासून मचाडो यांना रोखण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी एडमुंडो गोंजालेज यांना पाठिंबा दिला, मात्र त्या निवडणुकीतही मादुरो यांनी विजय मिळवला. आता मादुरो यांना अमेरिकेने उचलल्यानंतर मचाडो यांना संधी मिळेल असे वाटले होते, पण ट्रम्प यांच्या 'नो' मुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.