S Jaishankar on China: “चीनने कराराचे उल्लंघन केलेय, भारतासोबतच्या संबंधांचा सर्वांत कठीण काळ”: एस. जयशंकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 10:44 IST2022-02-20T10:41:38+5:302022-02-20T10:44:21+5:30
S Jaishankar on China: भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सुरू असलेल्या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

S Jaishankar on China: “चीनने कराराचे उल्लंघन केलेय, भारतासोबतच्या संबंधांचा सर्वांत कठीण काळ”: एस. जयशंकर
म्यूनिक: भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सुरू असलेल्या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. गेल्या सुमारे दीड वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमा रेषेवरून तणाव आहे. यातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी म्यूनिक येथील सुरक्षा परिषदेत सहभागी होताना एक मोठे विधान केले आहे. भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील सीमेसंदर्भात झालेल्या कराराचे पालन चीनकडून केले जात नाही. भारताचे चीनसोबत असलेले द्विपक्षीय संबंध सर्वांत कठीण काळातून जातायत, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
भारत आणि चीनच्या सीमेवरील परिस्थिती दोन देशांतील संबंधांची स्थिती निश्चित करेल. सीमा कराराचे उल्लंघन केल्याने भारताचे चीनसोबतचे संबंध अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत. सन १९७५ पासून सुमारे ४५ वर्षे भारत आणि चीनच्या सीमेवर शांतता होती. सीमा व्यवस्थापन स्थिर होते. लष्करी जीवितहानी झाली नाही. मात्र, आता तसे घडताना दिसत नाही. भारताने चीनशी सीमेवर किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य तैनात न करण्याचे करार केले होते. परंतु, चीनने कराराचे उल्लंघन केले, असे जयशंकर म्हणाले.
जून २०२० पूर्वी सीमेवर शांतता कायम होती
जून २०२० पूर्वीही भारताचे पाश्चात्य देशांसोबतचे संबंध चांगले होते. पूर्व लडाखमध्ये पॅंगॉंग लेक भागात हिंसक चकमकी झाल्यानंतर भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान सीमेवर संघर्ष सुरू झाला. दोन्ही देशांनी हळूहळू सैन्याची तैनाती वाढवली. जून २०२० रोजी गलवान व्हॅली येखे झालेल्या हिंसक संघर्षानंतर तणाव वाढला होता.
दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात सीमेवर शांतता कायम राहावी. या सीमावादावर काहीतरी तोडगा निघावा, यासाठी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. चर्चा सकारात्मक झाली असली, तरी यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.