अमेरिकेची पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची मदत; परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेवर टीका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 14:47 IST2022-09-26T13:50:10+5:302022-09-26T14:47:39+5:30
अमेरिकेने एफ-16च्या नावावर पाकिस्तानला 45 कोटी डॉलरचे पॅकेज मंजूर केले आहे.

अमेरिकेची पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची मदत; परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेवर टीका, म्हणाले...
S Jaishankar On US Pakistan Relations: एकीकडे अमेरिका (America) दहशतवादामुळे पाकिस्तानवर (Pakistan) टीका करत असतो, पण दुसरीकडे हाच अमेरिकापाकिस्तानला मोठी आर्थिक मदत करताना दिसत आहे. यावरुन आता भारताचे(India) परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी अमेरिका-पाकिस्तानच्या संबंधांवर टीका केली आणि अमेरिकेलाही सुनावलं आहे.
वॉशिंग्टनमध्ये आयोजित इंडियन-अमेरिकन कम्युनिटीच्या एका कार्यक्रमात बोलताना एस जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानसोबतचे संबंध अमेरिकेच्या हिताचे नाहीत. हे संबंध दोन्ही देशांच्या काही कामी येणार नाहीत. अमेरिकेने पाकिस्तानला एफ-16 विमानांसाठी 45 कोटी डॉलरच्या मेंटेनेंस पॅकेजला दिलेल्या मंजुरीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच, अमेरिकेने यावर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
मूर्ख बनवू शकत नाही
पाकिस्तानला मोठे आर्थिक पॅकेज मंजूर केल्यानंतर अमेरिकेने यामागचे कारण सांगितले होते की, दहशतवादाशी सामना करण्यासाठी एफ-16च्या मेंटेनेंस पॅकेजला मंजूरी दिली आहे. यावरुन जयशंकर म्हणाले की, एफ-16चा कुठे आणि कोणाविरोधात वापर होणार, हे सर्वांना माहित आहे. अशाप्रकारची वक्तव्ये करुन तुम्ही आम्हाला मूर्ख बनवू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी अमेरिकेला सुनावले.