नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:24 IST2025-10-10T07:24:38+5:302025-10-10T07:24:49+5:30
चीन आणि रशिया यांच्यात एक नवा डाव शिजतोय. तो म्हणजे तैवानवर संपूर्णपणे कब्जा मिळवण्यासाठी रशिया आता चीनला मदत करतोय आणि गनिमी काव्यानं तैवान कसं ताब्यात घ्यायचं याचे धडे रशिया चिनी सैनिकांना देतोय.

नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता तब्बल अडीच वर्षे उलटून गेली आहेत, तरीही हे युद्ध थांबलेलं नाही. मुख्य म्हणजे काही दिवसांत आम्ही युक्रेन बेचिराख करू असं म्हणणाऱ्या रशियालाही अजून युक्रेनवर निर्विवाद वर्चस्व गाजवता आलेलं नाही. अर्थात रशियानं युक्रेनचं प्रचंड प्रमाणात नुकसान मात्र नक्कीच केलं आहे.
या पार्श्वभूमीवर चीन आणि रशिया यांच्यात एक नवा डाव शिजतोय. तो म्हणजे तैवानवर संपूर्णपणे कब्जा मिळवण्यासाठी रशिया आता चीनला मदत करतोय आणि गनिमी काव्यानं तैवान कसं ताब्यात घ्यायचं याचे धडे रशिया चिनी सैनिकांना देतोय. याबाबत त्यांच्यात तसा ‘करार’च झाल्याचं काही कागदपत्रांच्या आधारे आता उघड झालंय. रशिया तसाही संरक्षण साहित्यात आणि शस्त्रास्त्रं बनवण्यात जगभरात माहीर आहेच, शिवाय गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेनबरोबरच्या युद्धानं इतरही अनेक गोष्टी रशियानंही ‘आत्मसात’ केल्या आहेत. युक्रेननं रशियाला तगडा प्रतिकार केला आणि रशियाच्या त्यांनी नाकी नव आणलं, असं म्हटलं जात असलं तरी खुद्द पुतिन आणि अनेक युद्धनीती जाणकारांना मात्र हे मत मान्य नाही. त्यांच्या मते रशियानं ठरवलं, तर रशिया आजही अल्पावधीत युक्रेन ताब्यात घेऊ शकतो; पण काही जागतिक आणि ‘वैयक्तिक’ कारणांमुळं रशियानं युक्रेनच्या बाबतीत ‘एक घाव, दोन तुकडे’ केेलेलं नाही.
तैवान जर झटक्यात ताब्यात घ्यायचा असेल तर त्यासाठीची रणनीती काय असावी, याबाबतचे धडे मात्र रशिया चीनला देतोय. यासंदर्भातला तब्बल ८०० पानांचा एक अतिसंवेदनशील रिपोर्ट नुकताच लीक झाला आहे. ब्रिटिश डिफेन्स थिंक टँक रॉयल युनायटेड सर्व्हिसेसनं (RUSI) त्यांना मिळालेल्या गुप्त कागदपत्रांच्या हवाल्यानं हा दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे, तैवानवर हल्ला करण्यासाठी रशिया चिनी पॅराट्रूपर्सना टँक, हत्यारं आणि टेक्नॉलॉजी पुरवतोय. शी जीनपिंग यांनीही आपल्या सेनेला उशिरात उशिरा २०२७ पर्यंत तैवान ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. तैवान हा आमचाच भाग आहे, असा दावा चीन गेल्या अनेक वर्षांपासून करतो आहे; पण तैवानचा प्रत्यक्ष ताबा मात्र त्यांच्याकडे नाही. तो ताबा त्यांना आता घ्यायचा आहे.
ठरलेल्या करारानुसार रशियन सेना चिनी सैनिकांना लँडिंग, फायर कंट्रोल आणि मूव्हमेंटच्या संदर्भात ट्रेनिंग देणार आहे. गुप्तपणे हे ट्रेनिंग सुरूही झालं आहे. रशिया चीनमध्ये एक टेक्नॉलॉजी मेंटेनन्स सेंटर उभारणार आहे. तिथे भविष्यातली अत्याधुनिक हत्यारं तयार केली जातील. रशियानं चीनला पाण्यात चालणाऱ्या अँटी टँक गन आणि एम्फीबियन टँकही आधीच दिले आहेत. जी साधनं रशियानं चीनला पुरवलीत त्यात 37 BMD-4M लाइट टँक, ज्यात १०० मिलीमीटर तोफा आणि ३० मिलीमीटर ऑटोमॅटिक गन्स आहेत. याशिवाय 11 स्प्रुट-SDM1 अँटी टँक गन्स; ज्या पाण्यातही चालू शकतात.
हवाई, समुद्री आणि सायबर हल्ल्यासाठी रशिया चीनला तयार करतो आहे. यामुळे आधीच युद्धग्रस्त वातावरणात आणखी तणाव भरला जाणार आहे. अमेरिकेचं म्हणणं आहे, ही तैवानवरील हल्ल्याची नुसतीच तयारी नाही, तर हे दोन्ही देश जगाला नव्या जागतिक युद्धाकडे घेऊन जाताहेत.