घ्या, घ्या रशियन कच्चे तेल घ्या! भारतालाच नाही... इतर देशांनाही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 07:58 IST2026-03-13T07:57:09+5:302026-03-13T07:58:12+5:30
Iran War, Russian Oil Sale: इराण-अमेरिका संघर्षामुळे कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशियन तेल विक्रीला तात्पुरती मुभा दिली आहे. पहा सविस्तर बातमी.

घ्या, घ्या रशियन कच्चे तेल घ्या! भारतालाच नाही... इतर देशांनाही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली परवानगी
मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि इराणने दिलेल्या गंभीर इशाऱ्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ रोखण्यासाठी अमेरिकेने अखेर नमते घेत रशियन तेलाच्या विक्रीला तात्पुरती मंजुरी दिली आहे. अमेरिकन ट्रेझरी विभागाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, जहाजांवर आधीच लोड केलेल्या रशियन कच्च्या तेलाच्या व्यवहारांना ११ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतासह इतर देशांनाही रशियन कच्चे तेल घेण्यास सांगण्यात आले आहे.
इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. ऑगस्ट २०२२ नंतर पहिल्यांदाच ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर गेले आहेत. ९.२ टक्क्यांच्या वाढीसह ते १००.४६ डॉलर्सवर पोहोचले, तर अमेरिकन बेंचमार्क (WTI) देखील ९५.७३ डॉलर्सवर स्थिरावला आहे.
इराणचा 'होर्मुझ'मधून इशारा
इराणच्या 'खातम अल-अनबिया' दलाने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, जर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर किंवा बंदरांवर हल्ला झाला, तर संपूर्ण क्षेत्रातील तेल आणि गॅस साठ्यांना आग लावली जाईल. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) मधील वाहतूक विस्कळीत झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणू शस्त्रे बनवण्यापासून रोखणे ही आपली प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे. मात्र, तेलाच्या वाढत्या किमती आणि शेअर बाजारातील घसरण पाहता अमेरिकेला धोरणात्मक निर्णय घेणे भाग पडले आहे. ऊर्जेचा पुरवठा खंडित होऊ नये म्हणून रशियन तेलाला दिलेली ही तात्पुरती सवलत जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा देण्याचा प्रयत्न मानला जात आहे.