कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 06:45 IST2025-05-25T06:45:51+5:302025-05-25T06:45:51+5:30
आजवर रशियाने कीव्ह शहरावर केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी हा एक हल्ला होता.

कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
कीव्ह : रशियन सुरक्षा दलाने युक्रेनची राजधानी कीव्ह शहरावर केलेल्या ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान १५ जण जखमी झाले. सुदैवाने हवाई हल्ल्यांत जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी रात्री उशिरा रशियाने कीव्ह शहराला लक्ष्य करत सुरू केलेले हल्ले शनिवारी पहाटेपर्यंत सुरू होते. या हल्ल्यांमुळे संपूर्ण शहरात स्फोटांचे आवाज येत होते.
रशियाकडून झालेल्या हल्ल्यांमुळे शहरातील नागरिकांना भूमिगत सबवे स्टेशनमध्ये आश्रय घ्यावा लागला. रात्रीच्या सुमारास रशियाने युक्रेनवर १४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे व २५० शाहिद ड्रोनने हल्ला केला. यापैकी सहा क्षेपणास्त्रे व ११७ ड्रोन युक्रेनच्या लष्कराने नष्ट केली. कीव्हच्या अनेक जिल्ह्यांत नष्ट केलेल्या ड्रोन व क्षेपणास्त्रांचे अवशेष पडले होते.
आजवर रशियाने कीव्ह शहरावर केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी हा एक हल्ला होता. त्यामुळे सर्वांसाठी ही एक कठीण रात्र होती. या हल्ल्यांमध्ये कीव्ह शहरातील ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या जिल्ह्यातील एक रहिवासी इमारत उद्ध्वस्त झाली तर दोन ठिकाणी आग लागल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. काही तासांपूर्वी रशिया व युक्रेनने एकमेकांच्या युद्धकैद्यांची सुटका केल्याच्या काही तासांनंतर हे हल्ले झाले.