मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:39 IST2025-10-29T14:38:45+5:302025-10-29T14:39:28+5:30
Russian Crude Oil, US Sanctions India : 'फ्युरिया' जहाजाने गुजरातच्या बंदराकडे येण्याचा मार्ग बदलला; भारतीय रिफायनरी कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची भीती, इंधन आयात अस्थिर होण्याची शक्यता

मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
रशियाकडून कच्चे तेल घेऊन भारताच्या दिशेने निघालेल्या एका टँकर जहाजाने बाल्टिक समुद्रात अचानक आपला मार्ग बदलल्यामुळे भारत-रशिया तेल व्यापारात मोठे संकट निर्माण झाले आहे. अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर घातलेल्या नवीन निर्बंधांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, भारताच्या तेल आयातीच्या धोरणाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, 'फ्युरिया' नावाच्या या जहाजाने रशियाच्या प्रिमोर्स्क बंदरातून सुमारे ७,३०,००० बॅरल 'युरल क्रूड ऑइल' भरले होते. हे तेल गुजरातच्या बंदरावर उतरवणे अपेक्षित होते. मात्र, डेन्मार्क आणि जर्मनी दरम्यानच्या फेहमर्न बेल्टजवळ पोहोचल्यानंतर या टँकरने आपला मार्ग बदलला आणि ते आता इजिप्तच्या पोर्ट सईदकडे वळले आहे. यामुळे भारतीय रिफानरींच्या चिंतेत वाढ झाली आहे. अचानक एवढे कच्चे तेल कुठून आणायचे, असा सवालही या कंपन्यांसमोर उपस्थित झाला आहे.
भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल न घेण्याबाबत वारंवार धमक्या दिल्या आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनसह भारतातील खासगी आणि सरकारी रिफायनरी कंपन्यांनी रशियन पुरवठादारांसोबत केलेल्या करारांचे पुनरावलोकन करण्यास सुरुवात केली आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंत रशियन ऊर्जा कंपन्यांशी सर्व व्यवहार थांबवण्याचे अल्टिमेटम अमेरिकेने दिल्याने, सवलतीच्या दरात मिळणाऱ्या रशियन तेलाच्या आयातीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संकटामुळे भारतीय रिफायनरींना आता मध्य-पूर्व, आफ्रिका किंवा लॅटिन अमेरिकेकडून महागडे पर्याय खरेदी करावे लागतील. यामुळे इनपुट खर्च वाढेल आणि रिफायनिंग मार्जिनवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.