'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:30 IST2025-09-25T12:28:51+5:302025-09-25T12:30:23+5:30
Donald Trump Russia Ukrain War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना डिवचले. रशियाचे लष्कर हे कागदी वाघासारखे आहेत, असे ते म्हणाले.

'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
Donald Trump Latest News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्र धोरणातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर अचानक यू टर्न घेतल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी पहिल्यांदाच युक्रेन रशियाविरोधात युद्ध जिंकू शकतो, असे म्हटले आहे. तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या युद्धाबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, रशियाचे लष्कर कागदी वाघासारखे आहे. शक्तिशाली सैन्याला युद्ध जिंकण्यासाठी एक आठवडाही लागलायला नको होता, असे म्हणत ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना डिवचलं.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, युक्रेन रशियाविरोधातील युद्ध जिंकू शकतो. युरोपच्या पाठिंब्याने युक्रेन हे साध्य करू शकतो. यापूर्वी युक्रेन जिंकू शकणार नाही, असे ट्रम्प म्हणाले होते.
न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांची बैठक झाली. या भेटीनंतर ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध जिंकू शकतो, याबद्दल विधान केले.
रशियाचे लष्कर कागदी घोड्यासारखे
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "कोणत्याही उद्देशाशिवाय रशिया मागील साडेतीन वर्षांपासून एक असे युद्ध लढत आहे, जे जिंकण्यासाठी खऱ्या शक्तिशाली सैन्याला एका आठवड्यापेक्षाही कमी वेळ लागायला हवा होता", अशा शब्दात ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले.
रशियाचा ट्रम्प यांच्यावर पलटवार
ट्रम्प यांच्या विधानावर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी उत्तर दिले. पेस्कोव्ह म्हणाले, "रशियाच्या लष्कराने युक्रेनवर आघाडी घेतली आहे आणि अर्थव्यवस्थाही स्थिर आहे. राहिला आमच्या लष्कराचा प्रश्न तर आमच्या राष्ट्राध्यक्षांनी वारंवार सांगितलं आहे की, आम्ही कमीत कमी नुकसान होईल आणि सावधगिरीने पुढे जाणार आहोत. आमच्या अशा पद्धतीच्या आक्रमकतेला कमी लेखणे मोठी चूक होईल."
"आम्ही खूप विचारपूर्वक लष्करी कारवाई करत आहोत. आम्ही अस्वल आहोत, वाघ नाहीये आणि कागदी वाघ असण्याचा प्रश्नच नाहीये", असा पलटवार रशियाने ट्रम्प यांच्यावर केला आहे.