सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 18:08 IST2025-06-02T17:58:58+5:302025-06-02T18:08:18+5:30
Russia Ukraine War Update: युक्रेनने रशियावर हल्ला केल्यानंतर पुतिन यांनी युक्रेनसह पाश्चात्य देशांनाही थेट इशारा दिला आहे.

सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी
Russia Ukraine War Update: युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या हल्ल्यात रशियाचे अनेक लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत. आता या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची पहिले प्रतिक्रिया समोर आली आहे. 'आम्ही युक्रेनला अशा वॉरहेड्सने प्रत्युत्तर देऊ, ज्याची उष्णता सूर्याच्या तापमानासारखी असेल,' असा धमकी वजा इशारा त्यांनी दिला. यावरुनच आता पुतिन आरपारच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते.
पुतिन यांचा थेट इशारा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला तीक्ष्ण इशारा दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, असा हल्ला करू की, सर्वकाही राख होऊन जाईल. रशिया आता टार्गेट निवडत आहे, हे टार्गेट युक्रेनच्याही पलीकडे असू शकतात. झेलेन्स्की आणि त्यांच्या पाश्चात्य मालकांना पश्चात्ताप करावा लागेल. आम्ही खूप सहन केले, आता रशिया गप्प बसणार नाही. त्यांच्या विधानाला पाश्चात्य मित्र राष्ट्रांसाठी, विशेषतः अमेरिका आणि नाटोसाठी थेट धोका मानले जात आहे. पुतिन यांनी ओरेसोनिक वॉरहेड्सने हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
Putin: “Oreshnik warheads reach the temperature of the sun!”
— RussiaNews 🇷🇺 (@mog_russEN) June 1, 2025
Russia is now selecting targets — possibly beyond Ukraine.
At 3 km/s and 4000°C, everything turns to ash
Zelensky, the West’s puppet, will regret it. The Russian response will be merciless.☠️ pic.twitter.com/mEOgDWsp6X
युक्रेनच्या पलीकडे लक्ष्य म्हणजे पाश्चात्य देश!
राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, प्रत्युत्तरात्मक हल्ल्यादरम्यान रशिया युक्रेनच्या पलीकडेही लक्ष्य करू शकतो. त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते की, रशिया केवळ युक्रेनपुरता मर्यादित राहणार नाही. गरज पडल्यास ते पाश्चात्य देशांवर, विशेषतः अमेरिका आणि नाटोवर देखील हल्ला करू शकतात. नाटो आणि अमेरिका युक्रेनला मदत करत असून, त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या मदतीनेच युक्रेन रशियन सीमेत हल्ला करण्यास सक्षम झाला आहे.
ओरेसोनिक वॉरहेड्स म्हणजे काय?
ओरेसोनिक वॉरहेड्स ही रशियाची हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आहेत. यामध्ये अवांगार्ड हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल आणि किन्झल (खंजीर) हायपरसोनिक क्षेपणास्त्रे सामील आहेत. ही इतर सर्व देशांच्या क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणालीला चुकवून अतिशय जलद आणि अचूक हल्ले करण्यास सक्षम आहेत. हे ध्वनीच्या वेगापेक्षा 5 पट वेगाने हल्ला करू शकतात.
पुतिन यांच्या दाव्यानुसार, रशियाकडे असे ओरेसोनिक वॉरहेड्स आहेत, जे प्रति सेकंद 3 किलोमीटर वेगाने उडतात आणि लक्ष्यावर कोसळताना ४००० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढते. हे सूर्याच्या तापमानाइतकेच आहे. हे मोठा विनाश आणि विध्वंस घडवून आणू शकतात.
तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला
पुतिन यांनी युक्रेनवर अण्वस्त्रांनी हल्ला केला, तर ते जगाला तिसऱ्या महायुद्धातही ढकलू शकते. पुतिन यांच्या विधानानंतर अमेरिका, ब्रिटन आणि नाटो खूप चिंतेत पडले आहेत. पुतिन यांचा संदेश केवळ लष्करी नसून मानसिक दबाव निर्माण करण्याची रणनीती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांसह अनेक युरोपीय देशांनी दोन्ही पक्षांना संयम बाळगण्याचे आणि युद्ध आणखी वाढण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.