पुतिन यांच्या घरावरील ड्रोन हल्ल्यानंतर रशियाचा मोठा निर्णय; घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्रांची तैनाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:25 IST2025-12-30T16:24:15+5:302025-12-30T16:25:04+5:30
Russia-Ukraine War: युक्रेनवर विनाशकारी प्रतिहल्ला होण्याची शक्यता.

पुतिन यांच्या घरावरील ड्रोन हल्ल्यानंतर रशियाचा मोठा निर्णय; घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्रांची तैनाती
Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियाने अत्यंत गंभीर आणि चकीत करणारे पाऊल उचलले आहे. रशियन सैन्याने पहिल्यांदाच अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र प्रणालीला अॅक्टिव्ह सेवेत दाखल केले आहे. या निर्णयामुळे युक्रेनवरील मोठ्या आणि विनाशकारी हल्ल्याचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रशियाचे संरक्षण मंत्रालय काय म्हणाले?
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले केले की, अण्वस्त्र-सक्षम ओरेशनिक क्षेपणास्त्र प्रणाली आता अधिकृतपणे सक्रिय सेवेत सामील झाली आहे. विशेष बाब म्हणजे, याच काळात युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या शांतता चर्चांमध्ये तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मंत्रालयानुसार, ओरेशनिक क्षेपणास्त्रे बेलारूसमध्ये तैनात करण्यात आली आहेत. या निमित्ताने लष्कराकडून एक संक्षिप्त समारंभही आयोजित करण्यात आला. मात्र, किती क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत, याचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.
ड्रोन हल्ल्यानंतर अवघ्या एका दिवसात तैनाती
पुतिन यांच्या अधिकृत निवासावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अवघ्या एका दिवसातच ही तैनाती करण्यात आली आहे. या हल्ल्याची माहिती पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनकडून करण्यात आलेल्या या ड्रोन हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “हे अतिशय चुकीचे कृत्य आहे. यामुळे शांतता प्रक्रियेला मोठा धक्का बसू शकतो,” असे त्यांनी म्हटले आहे.
युक्रेनसाठी वाढता धोका?
रशियाने ओरेशनिक क्षेपणास्त्रे सक्रिय केल्यामुळे युक्रेनसाठी येणारे दिवस अधिक कठीण ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुतिन यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर कीव आणि त्याचे पाश्चिमात्य समर्थक शांतता चर्चांमध्ये क्रेमलिनच्या अटी नाकारत असतील, तर मॉस्को युक्रेनमध्ये आपली लष्करी कारवाई आणखी तीव्र करेल.
शांतता चर्चांचा निर्णायक टप्पा
हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा रशिया-युक्रेन शांतता चर्चांबाबत निर्णायक टप्पा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची फ्लोरिडामधील रिसॉर्टवर भेट घेतली होती. ट्रम्प यांच्या मते, “कीव आणि मॉस्को शांतता कराराच्या आजवरच्या सर्वात जवळ आहेत.” मात्र, अद्यापही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा निघालेला नाही, त्यामध्ये कोणत्या भागातून कोणत्या सैन्याने माघार घ्यायची, रशियाच्या ताब्यात असलेल्या जापोरिज्जिया अणुऊर्जा प्रकल्पाचे भवितव्य यांचा समावेश आहे.
यापूर्वीही वापर झाला होता
रशियाने नोव्हेंबर 2024 मध्ये प्रथमच ओरेशनिक क्षेपणास्त्राचा वापर युक्रेनविरुद्ध केला होता. त्या वेळी डनीप्रो शहरातील एका कारखान्यावर हा हल्ला करण्यात आला होता, जो सोव्हिएत काळात क्षेपणास्त्र निर्मितीसाठी वापरला जात होता. ओरेशनिक क्षेपणास्त्रांच्या तैनातीमुळे रशिया-युक्रेन संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, संपूर्ण युरोप आणि जगभरात याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. अण्वस्त्र-सक्षम शस्त्रांच्या सक्रियतेमुळे हा संघर्ष धोकादायक वळणावर जाण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.