रशियाचा युक्रेनच्या उर्जा क्षेत्रावर सर्वात मोठा हल्ला; अख्खा देश अंधारात बुडाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:09 IST2025-10-30T18:51:01+5:302025-10-30T19:09:31+5:30
Russia-Ukraine War: 650 ड्रोन अन् 50 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा!

रशियाचा युक्रेनच्या उर्जा क्षेत्रावर सर्वात मोठा हल्ला; अख्खा देश अंधारात बुडाला...
Russia-Ukraine: रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या ऊर्जा क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे आहे. 650 हून अधिक ड्रोन आणि 50 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांद्वारे केलेल्या हल्ल्यामुळे, संपूर्ण युक्रेन अंधारात बुडाले आहे. अधिकृत माहितीनुसार, या हल्ल्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत.
ऊर्जा क्षेत्रावर मोठा प्रहार
हिवाळ्याची सुरुवात होताच रशिया युक्रेनच्या वीज, उष्णता आणि जलपुरवठा व्यवस्थेवर सतत हल्ले करत आहे, ज्यामुळे देशभरात हाहाकार माजला आहे. युक्रेनमधील बहुतांश शहरे वीजेवर आधारित केंद्रीकृत सार्वजनिक प्रणालीवर चालतात. वीजपुरवठा ठप्प झाल्याने पाणीपुरवठा, सांडपाणी आणि हीटिंग सेवा बंद पडल्या आहेत. युक्रेन सरकारने या हल्ल्याला 'ऊर्जा दहशतवाद' म्हटले आहे.
जेलेंस्कींचा आरोप...
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी म्हटले की, रशियाने या हल्ल्यात 650 पेक्षा जास्त ड्रोन आणि 50 हून अधिक विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. रशियाचे लक्ष्य युक्रेनला अंधारात ढकलणे असल्याचा आरोप केला.
अधिक संरक्षण प्रणालींची मागणी
युक्रेनच्या पंतप्रधान यूलिया स्विरीडेंको यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले की, रशियाच्या या ‘ऊर्जा दहशतवादाला’ थांबवण्यासाठी युक्रेनला अधिक वायु संरक्षण प्रणाली, मॉस्कोविरुद्ध कठोर निर्बंध आणि रशियावर जास्तीत जास्त राजनैतिक दबाव आवश्यक आहे. रशिया सिस्टिमॅटिक एनर्जी टेरर करत आहे. ही केवळ युद्धनीती नाही, तर आमच्या नागरिकांच्या जीवन आणि सन्मानावर हल्ला आहे.
कडाक्याच्या थंडीत संकट गडद
युक्रेनमध्ये हिवाळा सुरू होताच हा हल्ला झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. वीज आणि हीटिंग सेवांवर परिणाम झाल्याने लाखो लोकांना थंडीत अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा हल्ला गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक असल्याचे मानले जात आहे.