रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:24 IST2025-08-28T16:22:11+5:302025-08-28T16:24:09+5:30

Russia-Ukraine War: रशियाच्या हल्ल्याचा जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी निषेध केला आहे.

Russia-Ukraine War: Russia launches another major attack on Ukraine; 629 missiles and drones fired, many killed | रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत...अनेकांनी युद्ध संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दोन्ही देश मागे हटण्यास तयार नाही. या युद्धाची तीव्रहा कमी झाली असली तरी, दोन्ही देश अधुनमधून एकमेकांवर हल्ला करत राहतात. आता पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

रशियाच्या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू
रशियाने युक्रेनची राजधानी कीवमधील युरोपियन युनियन प्रतिनिधी भवनावर हल्ला केला आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की, या हल्ल्यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४८ जण जखमी आहेत. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील युरोपियन युनियनची एका इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. 

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, कीववरील रशियन हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात तीन मुलांचा समावेश आहे. या हल्ल्याचा केवळ युरोपियन युनियनकडूनच नव्हे, तर जगभरातून निषेध होणे आवश्यक आहे. युक्रेनमधील युरोपियन युनियनचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनीही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. 

रशिया युद्ध संपवू इच्छित नाही
अँटोनियो कोस्टा म्हणाले की, रशिया युद्ध संपवण्याचा निर्णय घेत नाही, उलट नवीन हल्ले करत आहे. या हल्ल्यात कीवमधील डझनभर इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये युक्रेनमध्ये युरोपियन युनियन प्रतिनिधी मंडळ असलेल्या इमारतीचा समावेश आहे. आता जगाने जोरदार प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. रशियाने सुरू केलेले आणि सुरू असलेले हे युद्ध थांबवावे लागेल.

युक्रेनवर ६२९ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी X वर पोस्ट करून दावा केला की, युक्रेनवर एकाच रात्रीत ६२९ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करण्यात आला. यात मुलांसह डझनभराहून अधिक लोक मारले गेले. निवासी क्षेत्रे आणि नागरी पायाभूत सुविधांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले. ही रशियाची शांतीची संकल्पना नाही, तर दहशतवाद आहे. फ्रान्स या मूर्खपणाच्या आणि क्रूर हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. 

Web Title: Russia-Ukraine War: Russia launches another major attack on Ukraine; 629 missiles and drones fired, many killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.