Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:06 IST2025-12-08T09:04:33+5:302025-12-08T09:06:30+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षावर पडदा टाकण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करताना दिसत आहेत.

Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षावर पडदा टाकण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ट्रम्प यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
वॉशिंग्टन डी.सी. येथील केनेडी सेंटर ऑनर्समधील रेड कार्पेटवर बोलताना ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनाच्या टॅरिफ धोरणासोबतच युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांवर भाष्य केले. ट्रम्प म्हणाले की, "मी आतापर्यंत ८ युद्धे थांबवली आहेत. त्यामुळे मला वाटले होते की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवणे थोडे सोपे असेल, पण तसे नाही." ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांच्यासह प्रमुख नेत्यांशी सातत्याने चर्चा केली जात आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकेने दोन्ही देशांसमोर ठेवलेला शांतता प्रस्ताव झेलेंस्की यांनी अद्याप वाचलेलाही नाही, याबद्दल ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली. "झेलेन्स्की यांनी अद्याप हा प्रस्ताव वाचला नाही, याबद्दल मी थोडा निराश आहे," असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने ठेवलेला हा प्रस्ताव रशियाला मान्य आहे असे दिसत आहे. परंतु, झेलेंस्की यावर सकारात्मक प्रतिसाद देतील की नाही? याची खात्री ट्रम्प देऊ शकले नाहीत. याचा अर्थ रशिया-युक्रेन युद्धाचा अंतिम निर्णय युक्रेनच्या भूमिकेवर आणि झेलेंस्की यांच्या प्रस्तावावरील प्रतिक्रियेवर अवलंबून असेल.
ट्रम्प यांनी मध्यस्थीसाठी पाऊल उचलले असले तरी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी अद्याप प्रस्तावाला प्रतिसाद न दिल्यामुळे शांतता प्रस्थापित होण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि युद्ध बंदी करण्याच्या दाव्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे.