रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:43 IST2025-11-06T12:42:44+5:302025-11-06T12:43:57+5:30
Russia-Ukraine: 1500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेले शहर ताब्यात घेण्यासाठी रशियाने 1 लाख सैनिकांची फौज पाठवली.

रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
Russia-Ukraine: मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध अद्याप थांबलेले नाही. युद्धाची तीव्रता पूर्वीपेक्षा कमी झाली असली तरी, दोन्ही बाजूंनी अधून-मधून एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. अशातच, युक्रेनच्या डोनेत्स्क प्रदेशातील 'पोक्रोव्स्क' (Pokrovsk) नावाचे शहर या युद्धाचा नवा केंद्रबिंदू ठरला आहे. कधीकाळी साठ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले हे शहर आज जवळपास उद्ध्वस्त झाले आहे. सततच्या हल्ल्यांमुळे इथली लोकसंख्या 1500 वर येऊन ठेपली आहे.
दरम्यान, जवळजवळ रिकाम्या शहरावर कब्जा मिळवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तब्बल 1 लाख सैनिक तैनात केले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या उद्ध्वस्त आणि ओसाड शहराला पुतिन इतके महत्त्व का देत आहेत ?
डोनबास प्रदेशाचा ‘दरवाजा’ आहे पोक्रोव्स्क
रॉयटर्सच्या माहितीनुसार, पोक्रोव्स्क हे पूर्व युक्रेनमधील डोनेट्स्क प्रदेशात असलेले एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. रणनीतिक दृष्टीने हा भाग रशियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रशियाची नजर पूर्ण डोनबास क्षेत्रावर (डोनेट्स्क आणि लुहान्स्क) आहे आणि पोक्रोव्स्क त्या प्रदेशाचा ‘गेटवे टू डोनेट्स्क’ आहे. जर रशियाने या शहरावर नियंत्रण मिळवले, तर पुढे तो क्रीमाटोर्स्क आणि स्लोवियान्स्क सारख्या मोठ्या युक्रेनियन शहरांकडे सहजपणे कूच करू शकतो.
कोळशाच्या खाणीही कारणीभूत
पोक्रोव्स्क परिसरात युक्रेनची एकमेव कोळसा खाण आहे, जी देशाच्या स्टील उद्योगाची कणा मानली जाते. रशिया या खाणीवर नियंत्रण मिळवून युक्रेनच्या औद्योगिक क्षमतेला धक्का द्यायचा प्रयत्न करत आहे. मेटइनवेस्ट कंपनीने जानेवारीत खाणकाम थांबवले होते, परंतु आता रशिया त्या क्षेत्रावर कब्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या खाणीमुळे या भागाचे आर्थिक आणि औद्योगिक महत्त्व अजून वाढते.
पुतिन यांची नवी रणनीती
आता रशिया थेट मोठ्या प्रमाणात युद्ध छेडण्याऐवजी हळूहळू घेरण्याची रणनीती वापरत आहे. लहान युनिट्स आणि ड्रोनच्या मदतीने युक्रेनच्या पुरवठा रेषा तोडल्या जात आहेत. रशियाचा दावा आहे की, या पद्धतीमुळे त्यांचे नुकसान कमी होत आहे. दुसरीकडे, कीव प्रशासनाचे म्हणणे आहे की, पोक्रोव्स्कच्या अनेक भागांवर अद्याप युक्रेनचे नियंत्रण कायम आहे आणि रशियन फौजांना मोठे नुकसान होत आहे.