युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:53 IST2025-06-09T18:52:58+5:302025-06-09T18:53:19+5:30
Russia-Ukraine: रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे.

युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
Russia-Ukraine: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. पण, कालची रात्र युक्रेनसाठी खूप भयावह होती. रशियाने ४७९ ड्रोन आणि २० क्षेपणास्त्रांच्या मदतीने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला. युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की, या हल्ल्यात देशाच्या मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेशांना लक्ष्य करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच युक्रेनने रशियाच्या हवाई तळावर मोठा हल्ला केला होता. युक्रेनच्या हल्ल्यात रशियाचे अनेक लढाऊ विमान नष्ट झाले होते. आता रशियाने युक्रेनवर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनियन हवाई दलाने दावा केला की, त्यांनी २७७ ड्रोन आणि १९ क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. मात्र, १० ड्रोन आणि काही क्षेपणास्त्रे त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली. या हल्ल्यात किती नुकसान झाले, हे अद्याप समोर आले नाही.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, पूर्व आणि ईशान्य आघाडींवरील परिस्थिती खूपच वाईट आहे. मात्र, त्यांनी रशियन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानाबद्दल जास्त माहिती दिली नाही. युक्रेनला त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांकडून हवाई संरक्षण प्रणालींची आवश्यकता आहे, परंतु अद्याप युक्रेनला हवी तशी मदत मिळाली नाही. आता हे युद्ध अजून किती दिवस चालते, हे पाहणे महत्वाचे आहे.