Russia Ukraine Crisis: आता युद्ध अटळ? यूक्रेनबाबत रशियाच्या घोषणेनंतर UNSC ची तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 08:03 AM2022-02-22T08:03:59+5:302022-02-22T08:04:57+5:30

सोमवारी रात्री उशिरा झालेल्या या बैठकीत रशियाच्या घोषणेवर व त्याचे आगामी परिणाम यावर चर्चा करण्यात आली.

Russia Ukraine Crisis: UN Security Council holds an emergency meeting on Ukraine | Russia Ukraine Crisis: आता युद्ध अटळ? यूक्रेनबाबत रशियाच्या घोषणेनंतर UNSC ची तातडीची बैठक

Russia Ukraine Crisis: आता युद्ध अटळ? यूक्रेनबाबत रशियाच्या घोषणेनंतर UNSC ची तातडीची बैठक

Next

किव – गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाला (Russia-Ukraine Crisis) आता वेगळं वळण मिळालं आहे. रशियानं यूक्रेनच्या डोनेस्तक आणि लुगांस्क या क्षेत्रांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देत असल्याचं देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रशिया यूक्रेनमधील युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. पुतीन यांच्या या घोषणेमुळे अमेरिका, जर्मनी, फ्रान्ससारखे देश भडकले आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची(UNSC) तातडीची बैठक बोलावली.

सोमवारी रात्री उशिरा झालेल्या या बैठकीत रशियाच्या घोषणेवर व त्याचे आगामी परिणाम यावर चर्चा करण्यात आली. त्यासह यूक्रेनच्या चिंतेबाबतही चर्चा झाली. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन(Vladimir Putin) यांनी यूक्रेनच्या डोनेस्तक आणि लुगांस्क क्षेत्राला देश म्हणून मान्यता दिली आहे. त्याला यूक्रेन, अमेरिका आणि अन्य ६ देशांनी UNSC बैठकीसाठी विनंती केली. त्यानंतर ही तातडीची बैठक बोलावण्यात आली. आता या मुद्द्यावर एक खुली बैठक आयोजित केली जाईल. ज्यात भारतही त्याची भूमिका मांडेल. UNSC बैठकीपूर्वीच, संयुक्त राष्ट्र कोणतीही कारवाई किंवा कठोर विधान करणार नाही असे मानले जात होते कारण रशियाकडे व्हिटो पॉवर आहे.

सर्व समीकरणे बदलली

पाश्चात्य देश काही काळापासून रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा धोका टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन(Joe Biden) यांनी पुतिन यांना भेटण्याचे मान्य केले होते, मात्र आता सर्व समीकरणे उलटली आहेत. आता युद्ध जवळपास निश्चित झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पाश्चात्य देशांच्या निर्बंधावर रशियानं उत्तर दिलं

युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसारखे पाश्चिमात्य देश रशियाला निर्बंध घालण्याच्या धमक्या देत आहेत. मात्र, रशियाने कुठल्याही घाबरत नसल्याचं स्पष्ट केले आहे. पूर्व युक्रेनपासून वेगळे झालेल्या डोनेस्तक (Donetsk) आणि लुगांस्क (Lugansk) या दोन क्षेत्रांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा करताना पुतीन यांनी निर्बंधांच्या धमक्यांनाही उत्तर दिले. ते म्हणाले की, पाश्चात्य देश निर्बंधांची धमकी देऊन आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे एकच ध्येय आहे - रशियाचा विकास थांबवणे आणि ते तसे करतील. आम्ही आमचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय हित आणि आमच्या मूल्यांशी कधीही तडजोड करणार नाही असं रशियानं ठणकावलं आहे.

Web Title: Russia Ukraine Crisis: UN Security Council holds an emergency meeting on Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.