Video: रशियात भीषण हिमवृष्टी; चार मजली इमारती बर्फाखाली, जनजीवन विस्कळीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 14:48 IST2026-01-18T14:47:02+5:302026-01-18T14:48:37+5:30
Russia Snowfall: बर्षवृष्टीने 30 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; दोन जणांचा मृत्यू

Video: रशियात भीषण हिमवृष्टी; चार मजली इमारती बर्फाखाली, जनजीवन विस्कळीत...
Russia Snowfall:रशियाच्या पूर्वेकडील कामचटका प्रायद्वीप परिसरात शनिवारी झालेल्या भीषण हिमवृष्टीमुळे संपूर्ण भाग अक्षरशः पांढऱ्या चादरीत गुंडाळला गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शक्तिशाली सायक्लोन आणि कमी दाबाच्या वादळांमुळे येथे 30 वर्षांतील सर्वाधिक बर्फवृष्टी नोंदवली गेली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
🇷🇺❄️ Kamchatka, Russia's Far Eastpic.twitter.com/rxSLJtncLB
— Spetsnaℤ 007 🇷🇺 (@Alex_Oloyede2) January 17, 2026
चार मजली इमारती बर्फाखाली...
परिस्थिती इतकी गंभीर आहे की, काही भागांत अनेक मीटर उंच बर्फ साचला आहे. रस्ते, घरे आणि वाहने बर्फाच्या थराखाली दबली आहेत. पेट्रोपावलोव्स्क-कामचात्स्की शहरातील अनेक वसाहती पूर्णपणे बर्फाने झाकल्या गेल्या असून, काही ठिकाणी बर्फाचे ढीग चार मजली इमारतींच्या उंचीइतके झाले आहेत. घरातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना थेट खिडक्यांतून उड्या मारून बर्फाच्या ढिगाऱ्यात उतरावे लागत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडीओंमध्ये नागरिक बर्फात उतरुन फावड्याने बर्फ खोदून घराबाहेर येताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये तर एक व्यक्ती तब्बल 5 मीटर जाड बर्फाखालून आपली कार बाहेर काढताना दिसतो.
🚨⚡️ Yesterday in Russia, in the Kamchatka region, people were digging out their cars from massive snow piles ❄️ pic.twitter.com/rZnGkMPdPw
— RussiaNews 🇷🇺 (@mog_russEN) January 17, 2026
30 वर्षांचा विक्रम मोडीत, आपत्कालीन परिस्थिती जाहीर
13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या वादळाने अवघ्या एका दिवसात सामान्य मासिक पर्जन्यमानाच्या 30 ते 60 टक्के बर्फवृष्टी केली. परिणामी सर्व शाळा बंद, सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प आणि अनेक विमानसेवा रद्द करावी लागली. सरकारने संपूर्ण परिसरात आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. आपत्कालीन सेवांनी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बर्फात सुरंग खोदण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, छतावरून कोसळलेल्या बर्फामुळे दोन नागरिकांचा मृत्यूही झाला आहे., त्यात एका ६३ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
pic.twitter.com/Sm4E0KZpLV Kamchatka
— Russian Market (@runews) January 17, 2026
कामचटका कुठे आहे?
कामचटका प्रशांत महासागर आणि ओखोत्स्क सागर यांच्या दरम्यान स्थित आहे. हा भाग पर्वतीय असून, थंड वारे आणि महासागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे येथे मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते. यंदा सातत्याने येणाऱ्या सायक्लोनमुळे बर्फ साचतच चालला आहे. हवामान बदलामुळे महासागर अधिक उष्ण होत असून, त्यातून अधिक आर्द्रता निर्माण होत आहे. हीच आर्द्रता थंड प्रदेशात विक्रमी हिमवृष्टीचे कारण ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रशासनासमोर मोठे आव्हान
स्थानिक प्रशासनाने बर्फ हटवण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात केले असले, तरी पुढील काही दिवसांत आणखी हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कामचटका परिसरात यंदाच्या हिवाळ्यातील ही सर्वात भीषण परिस्थिती मानली जात आहे.