हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:19 IST2025-09-01T18:19:03+5:302025-09-01T18:19:38+5:30
मोदी आणि पुतिन यांच्यातील ही चर्चा यासाठी महत्त्वाची आहे कारण ही चर्चा अशा मुद्द्यांवर झाली, ज्याची माहिती अन्य कुणालाही नाही

हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ऑरस लिमोझिन कारमध्ये लिफ्ट दिली. हे दोन्ही नेते द्विपक्षीय चर्चेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी एकत्र पोहचले. रशियाच्या राष्ट्रीय रेडिओ स्टेशननुसार पुतिन यांच्या लिमोझिनमध्ये हॉटेलपर्यंत पोहचण्याच्या मार्गात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. हॉटेलमध्येच दोन्ही नेते आपापल्या शिष्टमंडळासह एकमेकांना भेटणार होते. मात्र हॉटेलला पोहचल्यावरही रशियाचे राष्ट्रपती लिमोजीन कारमधून उतरले नाही. त्यांच्यात ५० मिनिटे चर्चा सुरू होती. पुतिन यांनी स्वत:च मोदी यांना कारमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केल्याचं बोलले जाते.
याबाबत रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी एक निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी कारमध्ये सुमारे एक तास समोरासमोर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी लिमोझिनमधील स्वतःचा आणि रशियन राष्ट्राध्यक्षांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 'एससीओ शिखर परिषदेच्या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अध्यक्ष पुतिन आणि मी एकत्र द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणी पोहोचलो. त्यांच्याशी झालेल्या चर्चा नेहमीच फलदायी असतात असं मोदी यांनी म्हटलं.
ही चर्चा का महत्त्वाची?
मोदी आणि पुतिन यांच्यातील ही चर्चा यासाठी महत्त्वाची आहे कारण ही चर्चा अशा मुद्द्यांवर झाली, ज्याची माहिती अन्य कुणालाही नाही. द्विपक्षीय चर्चेत मोदी यांनी पुतिन यांना युक्रेनसोबतचा संघर्ष लवकर संपवण्याचं आवाहन केले. मानवतेच्या दृष्टीने संघर्ष लवकरात लवकर संपवावा आणि या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता आणण्याचे मार्ग शोधावेत अशी मागणी मोदींनी केली आहे. भारत रशियन नेत्याचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचं सांगत मोदींनी पुतिन यांना देशात येण्याचे आमंत्रण दिले. पुतिन डिसेंबरमध्ये मोदींसोबत शिखर परिषदेसाठी भारताला भेट देणार आहेत.