Russia Plane Crash Video: रशियामध्ये प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. विमानाने उड्डाण केले आणि काही वेळातच हवाई नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला. या विमानाचा शोध सुरू असताना डोंगराळ भागातून धुराचे लोट दिसले. हेलिकॉप्टर जवळ गेल्यानंतर जंगलात हे विमान कोसळल्याचे समोर आले. विमान कोसळल्यानंतरचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात धुराचे लोट आणि विमानाचा फक्त सांगाडाचा दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रशियातील अमूर प्रांतामध्ये हा भीषण विमान अपघात झाला. चीन सीमेला लागून हा प्रांत आहे.अमूर प्रांतातीलच ब्लागोवेश्चेन्स्क शहरातून हे विमान टिंडा शहराकडे निघाले होते. सुरूवातीला विमानात ४३ लोक होते असे सांगण्यात आले. पण, नव्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार विमानामध्ये पाच लहान मुले आणि कॅबिन क्रू यांच्यासह ४९ जण होते.
विमानाने उड्डाण केले. टिंडा शहरापासून १६ किमी दूर असतानाच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमान बेपत्ता झाल्याचे रशियाच्या नागरी उड्डाण विभागाकडून सांगण्यात आले.
विमानाचा हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध
सैबेरिया स्थित अंगारा एअरलाईन्सचे AN24 हे विमान बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला. हेलिकॉप्टरच्या मदतीने या विमानाचा शोध सुरू करण्यात आला.
शोध सुरू असतानाच अमूर प्रांताच्या पूर्वेकडील डोंगररागांमधून धुराचे लोट दिसले. हेलिकॉप्टर त्या ठिकाणी गेल्यानंतर झाडांमध्ये विमाने कोसळल्याचे दिसून आले. जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात विमानाचे अनेक तुकडे झाले आहेत. आणि सांगाडा जळाला आहे.
अपघातग्रस्त विमानाचा व्हिडीओ
अंगारा एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात का झाला?
रशियाच्या आपतकालीन मंत्रालयाने म्हटले आहे की, रशियाच्या नागरी उड्डाण विभागाला हे विमान जळत असलेल्या अवस्थेत आढळून आले. रशियातील टास्स वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी झाल्याने हा अपघात झाला, असे प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे.
विमानांची बांधणी ५० वर्षांपूर्वीची
अंगारा एअरलाई्न्सचे अपघातग्रस्त झालेले विमान ५० वर्षांपूर्वीचे आहे. विमानाच्या शेपटीवर त्याची बांधणी १९७६ मध्ये करण्यात आलेली असल्याचा उल्लेख आहे. विमान बेपत्ता झाल्यानंतर त्याचा हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध कार्य सुरू करण्यात आले होते. डोंगराळ भागातून धूर येत असल्याचे दिसून आले. हेलिकॉप्टर अपघातस्थळी पोहोचले त्यावेळी विमानाचा मुख्य भाग जळत होता. ही माहिती मिळताच तातडी मदतकार्य सुरु करण्यात आले.