रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 15 ऑगस्टला अलास्का येथे युक्रेन युद्धासंदर्भात शांती चर्चा होणार आहे. मात्र या चर्चेपूर्वीच दोन्ही देशांतील कुटनीतीक तणाव प्रचंड वाढला आहे. महत्वाचे म्हणजे, रशियन अर्थव्यवस्था संकटात असल्याचे सांगत, या बैठकीसाठी पुतिन यांनी स्वतः फोन केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान, रशियाने आपल्या सैन्य शक्तीचे प्रदर्शन सुरू केले आहे. यात जगातील सर्वात वादग्रस्त आणि घातक मिसाइल्सपैकी एक असलेल्या 9M730 बुरेव्हेस्टनिकच्या संभाव्य चाचणीची तयारीही समाविष्ट आहे.
9M730 बुरेव्हेस्टनिक हे रशियाचे अजेय शस्त्र आहे. हे अणुऊर्जेद्वारे ऑपरेट केले जाणार क्रूझ मिसाइल आहे. हे मिसाइल अण्वशस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असून जगाच्या कुठल्याही भागात हल्ला करू शकते. महत्वाचे म्हणजे, याचा मार्गही बदलला जाऊ शकतो, यामुळे हे मिसाइल रोखणे अत्यंत कठीण आहे. यूएस NASIC च्या अहवालानुसार, जर हे मिसाइल सक्रिय सेवेत आले, तर रशियाला एक मोठी धोरणात्मक आघाडी मिळू शकते. यामुळे नंतर, रशियाला रोखणे पाश्चात्य देशांना कठीण जाईल.
रशियाने 7 ते 12 ऑगस्टपर्यंत 40,000 वर्ग किलोमीटर भागात NOTAM (Notice to Airmen) जारी केले आहे. असा साधारणपणे एखाद्या मोठा मिसाइलच्या परीक्षणापूर्वीच केले जाते. दरम्यान रशियाने चार रशियन जहाजे पॅनकोव्हो टेस्टिंग रेंज जवळून हटवून पूर्व बॅरेंट्स सागरात पाळत ठेवणाऱ्या चौक्यांवर तैनात केली आहेत. दोन रोसाटॉम विमाने रोगचेव्हो एअरपोर्टवर तैनात आहेत. रसद पुरवठ्यासाठी मालवाहू जहाजांची हालचाल वाढवण्यात आली आहे. नॉर्वेच्या द बॅरेंट्स ऑब्झर्व्हरच्या मते, पॅनकोव्हो रेंजमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून तयारी सुरू आहे.
पुतिन-ट्रम्प चर्चेपूर्वी रशियाचे हे पाऊल अमेरिकेवर मानसिक दबाव निर्माण करू शकते. तज्ञांच्या मते, हे केवळ तांत्रिक प्रात्यक्षिकच नाही, तर रशिया आपल्या लष्करी क्षमतेसंदर्भात तडजोड करणार नाही, असा राजकीय संकेतही आहे.