वॉशिंग्टन : अमेरिकेच्या युद्धनौका, विमाने आणि इतर लष्करी मालमत्तांवर अचूकपणे हल्ले करण्यास सोपे जाण्यासाठी रशियाकडूनइराणला महत्त्वाची माहिती पुरवली जात असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागासंबंधित दोन अधिकाऱ्यांनी केला आहे; पण यासंदर्भातील थेट पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असेही या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या संवेदनशील विषयावर सार्वजनिकपणे भाष्य करण्याचा अधिकार नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी आपले नाव उघड केलेले नाही. ही घडामोड अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलचाइराणवर मारा सुरू आहे आणि इराण पर्शियन गल्फमधील अमेरिकेच्या मालमत्ता व मित्रराष्ट्रांवर हल्ले करत आहे. अमेरिका व इस्रायलने इराणविरुद्ध आठवड्याभरापूर्वी पुकारलेल्या युद्धात रशियाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे हे पहिलेच संकेत आहेत.
व्हाइट हाउसने महत्त्व दिले नाही
रशिया इराणला गुप्तचर माहिती पुरवत असल्याच्या वृत्ताला व्हाइट हाउसने फारसे महत्त्व दिले नाही. व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी शुक्रवारी सांगितले की, याचा इराणमधील लष्करी मोहिमेवर कोणताही फरक पडत नाही, कारण आम्ही त्यांचे लष्करी सामर्थ्य पूर्णपणे मोडीत काढत आहोत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी सांगितले की, अमेरिका प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे, युद्धनियोजनामध्ये या सर्व बाबींचा विचार केला जात आहे.
‘उत्तर इस्रायल रिकामे करा!’
लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाने शनिवारी उत्तर इस्रायलमधील किरयात शमोना आणि नाहारिया या शहरांमधील रहिवाशांना तातडीने परिसर सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. हिजबुल्लाच्या या इशाऱ्यानंतर काही वेळातच नाहारिया, किरयात शमोना व तिबेरियास परिसरात धोक्याचे सायरन वाजू लागले. हिजबुल्लाने इस्रायलने दिलेल्या चेतावणीवर प्रत्युत्तराची ही चेतावणी जारी केली आहे.
ट्रम्प यांच्या हत्येच्या कट, पाकिस्तानी दोषी
न्यूयॉर्क : २०२० मध्ये मारले गेलेले इराणी ‘कूद्स फोर्स’चे कमांडर कासेम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अमेरिकी नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका पाकिस्तानी नागरिकाला ब्रुकलिन न्यायालयाने येथे दोषी ठरविण्यात आले आहे.
आसिफ रझा मर्चंट (४८) असे या नागरिकाचे नाव असून, ट्रम्प यांच्यासह माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांच्या हत्येच्या कटात तो सामील होता. तो इराणचा हस्तक होता. विविध आरोपांखाली दोषी ठरवण्यात आलेल्या मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.