‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 07:44 IST2025-07-10T07:44:09+5:302025-07-10T07:44:33+5:30
२०२३मध्ये रशियात प्रति महिला १.४१ मूल, असा जन्मदर होता, पण लोकसंख्या स्थिर ठेवायची तर प्रति महिला हा जन्मदर २.०५ इतका असणं आवश्यक मानलं जातं. पण तो दर राखता येत नसल्यानं रशियानं अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत

‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
देशाची लोकसंख्या झपाट्यानं कमी होते आहे. दुसरीकडे युद्ध सुरू आहे. तिथे हजारो, लाखो सैनिक कामी येत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी आणि सैनिकांनीही देशातून पलायन केलं आहे. देश चालवायचा आणि आपलं अस्तित्व टिकवायचं तर मग काय करायचं?..रशियापुढे हा सध्या एक मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी काय करावं? अर्थातच त्यांनी आपल्या देशातील महिलांना जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी मोठमोठी आमिषं दाखवली जात आहेत, सुविधा पुरवल्या जात आहेत.. पण या महिला सज्ञान, विवाह योग्य असतील तर ठीक आहे, पण रशियानं आपल्या देशातील जननदर वाढविण्यासाठी आता अल्पवयीन आणि शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुलींनाही त्यांनी मुलं जन्माला घालावीत यासाठी ‘बक्षीस’ द्यायला सुरुवात केली आहे.
ज्या मुली आपल्या बाळांना जन्म देतील आणि त्यांच पालनपोषण करतील त्यांना तब्बल एक लाख रुबल्स (साधारण एक लाख दहा हजार रुपये) देण्यात येणार आहेत. पण हे सगळं ‘कायदेशीर’ आणि ‘नैतिक’ दृष्टीनं असेल तर ठीक, पण तेही नाही! या मुली, तरुणी विवाहित नसल्या तरी चालतील, त्यांनी मुलांना फक्त जन्म दिला तरी त्यांना अनेक आर्थिक आणि सामाजिक लाभ दिले जाणार आहेत. मार्च २०२५ पासून रशियाच्या दहा विभागांत ही योजना सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ही योजना फक्त सज्ञान म्हणजे वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या महिलांसाठीच होती, पण त्यानंतर त्यात बदल करत सरकारनं अल्पवयीन मुलींनाही त्यात समाविष्ट करून घेतलं आहे. अर्थात या नव्या योजनेवरून वादविवादही सुरू आहेत. यासंदर्भात रशियात नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ४३ टक्के लोकांनी या योजनेला पाठिंबा दिला आहे, तर ४० टक्के लोकांनी विरोध केला आहे, पण सरकारला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. काहीही करून आपल्या देशाची लोकसंख्या वाढली पाहिजे एवढंच त्यांचं ध्येय आणि प्राथमिकता आहे.
२०२३मध्ये रशियात प्रति महिला १.४१ मूल, असा जन्मदर होता, पण लोकसंख्या स्थिर ठेवायची तर प्रति महिला हा जन्मदर २.०५ इतका असणं आवश्यक मानलं जातं. पण तो दर राखता येत नसल्यानं रशियानं अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही ‘अधिकाधिक मुलं जन्माला घाला’ असं आवाहन देशाला आणि महिलांना वारंवार केलं आहे. त्यामुळे देश आणि देशाचं लष्कर ताकदवान होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. देशाचा जननदर वाढावा यासाठी ज्या महिला दहा किंवा त्यापेक्षा जास्त मुलं जन्माला घालतील त्यांना ‘मदरहूड मेडल’नं सन्मानित केलं जातं. एकसंध सोव्हिएत रशियाच्या काळातही हे मेडल दिलं जात होतं, पुतीन यांनी ही योजना पुनरुज्जिवित केली!
२०२४मध्ये रशियन संसदेनं असाही एक कायदा पास केला आहे, ज्यामुळे देशातील कोणाही व्यक्तीला अविवाहित राहण्यासाठी कोणाला प्रोत्साहन देता येणार नाही किंवा तशी जाहिरात करता येणार नाही. तरुणाईनं ‘सिंगल’ राहावं किंवा त्यांनी मुलं जन्माला घालू नयेत, असं आवाहन कोणी केल्यास त्यांना कठोर शिक्षा देण्याचीही तरतूद आहे.