रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 12:12 IST2025-09-07T12:04:53+5:302025-09-07T12:12:11+5:30
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध वाढत चालले आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध मागील काही वर्षापासून सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जगभरातील नेते प्रयत्नात आहेत. पण, युद्ध थांबलेलं नाही. युद्ध आणखी वाढतच आहे. आता रशियाने पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी कीववर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर कीवमधील कॅबिनेट इमारतीच्या छतावरून धूरही निघताना दिसला आहे. हा धूर हल्ल्यामुळे दिसला की इतर काही कारणाने बाहेर पडत होता हे समोर आलेले नाही.
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
दोन जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, कीव शहर प्रशासनाचे प्रमुख तैमूर तकाचेन्को यांनी सांगितले की, मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. मुलाचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला आहे. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को म्हणाले की, रशियाने सोडलेल्या ड्रोनचा ढिगारा स्वियाटोशिंस्की जिल्ह्यातील एका निवासी इमारतीवर आणि कीवच्या डार्नित्सकी जिल्ह्यातील दुसऱ्या इमारतीवर पडला. या हल्ल्यात १० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
एक दिवस आधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर आरोप केले होते. रशियाने सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत १३०० हून अधिक ड्रोन हल्ले केले आहेत, असा आरोप त्यांनी केला. याशिवाय ९०० गाईडेड एरियल बॉम्ब आणि ५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याऐवजी वेग घेत आहे.