युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना रशियाची मोठी घोषणा; सोन्यावरून व्हॅट हटवला, सोनं स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 22:07 IST2022-03-09T22:07:08+5:302022-03-09T22:07:49+5:30
अमेरिकेला शह देण्यासाठी रशियाचा मोठा निर्णय; सोन्याच्या दरात मोठी घसरण

युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना रशियाची मोठी घोषणा; सोन्यावरून व्हॅट हटवला, सोनं स्वस्त
नवी दिल्ली: रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहेत. युक्रेन विरोधात युद्ध पुकारणाऱ्या रशियावर अमेरिका आणि युरोपियन देशांनी अनेक निर्बंध लादले आहेत. रशियाकडून पेट्रोल आणि नैसर्गिक वायू खरेदी न करण्याचा निर्णय कालच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी घेतला. त्यानंतर आता रशियानं अमेरिकेला धक्का देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पुतीन यांनी सोन्याच्या खरेदीवर लागणारा मूल्यवर्धित कर (व्हॅट) हटवण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन डॉलरला धक्का देण्यासाठी पुतीन यांनी हा निर्णय घेतला आहे. व्हॅट हटवल्यानं सोनं आधीपेक्षा स्वस्त होईल. रशियामध्ये सोनं खरेदीवर आधी खरेदी किमतीच्या २० टक्के व्हॅट द्यावा लागत होता. ग्राहक जेव्हा सोनं विकायला जात होते, तेव्हा त्यांना व्हॅटची रक्कम परत मिळत नव्हती.
रशियानं सांगितलं निर्णयामागचं कारण
नागरिक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. मात्र व्हॅटमुळे सोनं महाग होतं. रशियात अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रशियन चलन असलेल्या रुबलचं मूल्य वेगानं घसरत आहे. त्यामुळेच रशियानं अमेरिकन डॉलरसह काही परकीय चलनांच्या खरेदीवर प्रतिबंध लादले आहेत. लोकांनी रुबलमध्ये गुंतवणूक करावी या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
रशियातील जनता साधारणपणे आपली बचत डॉलरमध्ये गुंतवते. पुतीन यांनी सोन्यावरील व्हॅट रद्द करण्याचा निर्णय घेतला. गुंतवणूकदारांनी डॉलरऐवजी सोन्यात अधिक गुंतवणूक करावी, या उद्देशानं पुतीन यांनी हा निर्णय घेतला आहे.