Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 08:45 IST2025-12-08T08:42:33+5:302025-12-08T08:45:16+5:30
Russia Attack Ukraine energy infrastructure: युद्ध थांबवण्याच्या हालचाली सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर आणखी एक मोठा हल्ला केला. रशियाने युक्रेनवर ६५३ डोन्स डागली.

Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाची धग अजूनही कमी झालेली नाही. दोन्ही देशातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी रशियाचे युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता वाढली आहे. रशियाने युक्रेनवर ६५३ ड्रोन्स आणि ५१ मिसाईल्स डागत मोठा हवाई हल्ला केला. सशस्त्र सेना दिनीच रशियाने हा हल्ला केला.
रशियाने केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, आम्ही मोठ्या प्रमाणात ड्रोन्स आणि मिसाईल्स हवेतच उद्ध्वस्त केल्या. ५८५ ड्रोन्स हवेतच उडवण्यात आली. त्याचबरोबर ३० मिसाईल्सही हवेत असतानाच नष्ट करण्यात आल्या.
युक्रेनचे गृहमंत्री इगोर क्लिमेंका म्हणाले, "रशियाने केलेल्या हल्ल्यात आठ लोक जखमी झाले आहेत. आठपैकी तीन लोक कीवमध्ये जखमी झाले आहेत."
विद्युत प्रकल्पांवर हल्ले
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की म्हणाले की, "रशियाने मुख्यतः विद्युत प्रकल्पांना लक्ष्य केले. एका ड्रोन हल्ल्यात कीव मधील फास्टिव्ह शहरातील रेल्वे स्टेशन जळून राख झाले."
युक्रेनची राष्ट्रीय विद्युत पुरवठा करणारी संस्था उक्रेनेर्गोने टेलिग्रामवर सांगितले की, रशियाने युक्रेनमधील अनेक विद्युत केंद्र आणि इतर ऊर्जा पुरवठा करणाऱ्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या आहेत.
रशिया म्हणाला, आम्ही युक्रेनचे ११६ ड्रोन्स पाडले
दुसरीकडे रशियानेही दावा केला आहे की, त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टिमने युक्रेनकडून डागण्यात आलेले ११६ ड्रोन्स पाडले आहेत. रशियन टेलिग्राम वृत्तवाहिनी एक्स्ट्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, युक्रेनने रशियाच्या रियाजान तेल शुद्धिकरण प्रकल्पावर हल्ला केला होता. वृत्तवाहिनीने काही व्हिडीओही दाखवले, ज्यात तेल शुद्धिकरण प्रकल्पाला आग लागलेली आणि धूराचे लोट आकाशा उडताना दिसत आहेत.