प्रेयसीला भेटायला गेला अन् चोरीच्या आरोपात अडकला; सैनिकाला ४ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 01:30 PM2024-06-19T13:30:17+5:302024-06-19T13:31:03+5:30

रशियन शहरातील व्लादिवोस्तोक येथील न्यायालयाने बुधवारी एका ३४ वर्षीय अमेरिकन सैनिकाला चोरी आणि खुनाची धमकी दिल्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे.

russia arrested amercian soldier russia america relations | प्रेयसीला भेटायला गेला अन् चोरीच्या आरोपात अडकला; सैनिकाला ४ वर्षांची शिक्षा

प्रेयसीला भेटायला गेला अन् चोरीच्या आरोपात अडकला; सैनिकाला ४ वर्षांची शिक्षा

रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंधात बराच दुरावा निर्माण झाला आहे. दरम्यान रशियन कोर्टाने एका अमेरिकन सैनिकाला चोरीच्या आरोपाखाली चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. रशियन शहरातील व्लादिवोस्तोक येथील न्यायालयाने बुधवारी एका ३४ वर्षीय अमेरिकन सैनिकाला चोरी आणि खुनाची धमकी दिल्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे.

गॉर्डन ब्लॅक असे या अमेरिकन सैनिकाचे नाव असून तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात गेला होता. या सैनिकावर त्याच्या प्रेयसीने चोरीचा आरोप केला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर गॉर्डन ब्लॅक याला न्यायलयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी गॉर्डन ब्लॅकला दहा हजार रूबल म्हणजेच अंदाजे ९ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

सैनिक रशियात कसा पोहोचला?
गॉर्डन ब्लॅक रजेवर होता आणि तो दक्षिण कोरियाहून टेक्सास येथील फोर्ट कावाझोसमधील आपल्या बेसवर परतणार होता, जिथे तो कॅम्प हम्फ्रेज येथे सैन्यासह तैनात होता. लष्कराच्या प्रवक्ता सिंथिया स्मिथ यांनी सांगितले की, गॉर्डन ब्लॅकने मायदेशी परतण्यासाठी साइन आउट केले होते, परंतु तो त्याच्या घरी पोहोचला नाही. त्याऐवजी गॉर्डन ब्लॅक आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी चीनमार्गे रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात पोहोचला होता.

प्रेयसीकडून चोरीचा आरोप
प्रेयसीला भेटायला गॉर्डन ब्लॅक आला. मात्र, प्रेयसीनेच गॉर्डन ब्लॅकवर चोरीचा आरोप केला. प्रेयसी अलेक्झांड्रा वॉशचुकने सांगितले की, गॉर्डन ब्लॅक आणि तिच्यामध्ये घरगुती वाद झाला होता. यादरम्यान गॉर्डन ब्लॅक चिडला आणि मारहाण केली. तसेच, गॉर्डन ब्लॅकने माझ्या पर्समधून पैसे चोरले, असे अलेक्झांड्रा वॉशचुकने सांगितले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, गॉर्डन ब्लॅक विवाहित होता आणि तो दक्षिण कोरियामध्ये त्याच्या प्रेयसीला भेटला होता.

रशियाच्या तुरुंगात अनेक अमेरिकन 
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यात बराच तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता अमेरिकन सैनिकाच्या अटकेनंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडले. कॉर्पोरेट सुरक्षा कार्यकारी पॉल व्हेलन, वॉल स्ट्रीट जर्नलचे रिपोर्टर इव्हान गेर्शकोविच आणि संगीतकार ट्रॅव्हिस लीक यांच्यासह अनेक अमेरिकन नागरिकांना रशियाने तुरुंगात टाकले आहे. दरम्यान, या अमेरिकन नागरिकांना रशियन सरकारने चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचे अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे. तसेच या नागरिकांच्या सुटकेसाठी अमेरिकन सरकार वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे.

रशियाला जाण्याची परवानगी नाही
या घटनेनंतर आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन नागरिकांना रशियात न जाण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनच्या धोरणानुसार, कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सैनिकांना सुरक्षा व्यवस्थापक किंवा कमांडरकडून परवानगी घ्यावी लागेल. पण  गॉर्डन ब्लॅकने रशियात जाण्यासाठी परवानगी मागितली नसल्याचे अमेरिकन लष्कराने म्हटले आहे.

Web Title: russia arrested amercian soldier russia america relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.