बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 09:50 IST2025-11-09T09:49:38+5:302025-11-09T09:50:55+5:30
महत्वाचे म्हणजे, हा सराव माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विसर्जित अवामी लीगने १३ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या “ढाका लॉकडाऊन” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे.

बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकाला सध्या छावणीचे स्वरुप आले आहे. शेख हसीना यांच्या प्रभावामुळे बांगलादेशातील युनूस सरकार असे काही गडबडले आहे की, संपूर्ण ढाक्यातील सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. खरे तर, राजधानी ढाका येथे शनिवार (8 नोव्हेंबर) पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा सराव केला. महत्वाचे म्हणजे, हा सराव माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विसर्जित अवामी लीगने १३ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या “ढाका लॉकडाऊन” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे.
ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या (DMP) माहितीनुसार, सुमारे ७००० पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील १४२ महत्त्वाच्या ठिकाणी हा सराव केला. यात अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनुस यांच्या निवासस्थानाचाही समावेश होता. आगामी आठवड्यातील संभाव्य हिंसक निदर्शनांना तोंड देण्याच्या उद्देशाने हा सराव करण्यात आला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यात पोलिसांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, यामुळे नागरिकांमध्ये कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली आहे. बांग्लादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण लवकरच शेख हसीना यांच्यावरील मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या खटल्याचा निकाल जाहीर करणार आहे. तसेच, पोलिसांनी ही तैनाती म्हणजे, नियमित सुरक्षा कवायतीचा भाग असल्याचे म्हटले आहे.
ढाक्यातील प्रमुख चौकांत पोलीस दंगलविरोधी उपकरणांसह तैनात आहेत. पादचार्यांच्या बॅग तपासल्या जात आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. पोलीस प्रवक्ता मुहम्मद तालेबुर रहमान यांनी सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीसाठी तत्पर राहणे ही आमची नियमित कार्यपद्धती आहे.” एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हा मेगा सराव पोलिसांच्या समन्वयाची चाचणी आणि १३ नोव्हेंबरपूर्वी संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय होता.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी लष्कराने १५ महिन्यांपासून पोलिसिंग ड्युटीवर असलेल्या ६०,००० सैनिकांपैकी अर्धे सैनिक परत बोलावले आहेत. तसेच, सैनिकांना विश्रांती आणि प्रशिक्षणाची गरज गरज असल्याचेही लष्कराने म्हटले आहे.