हवेत उडणाऱ्या सापांचा लागला शोध, रहस्यमय गुहेत राहतात; जगासमोर पहिल्यांदाच आली नवी प्रजाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 20:10 IST2026-03-28T20:09:43+5:302026-03-28T20:10:00+5:30
विशेष म्हणजे सापांची ही प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. या सापांच्या चमकत्या रंगामुळे त्यांचा अवैध व्यापार होत असल्याचेही समोर आले आहे.

हवेत उडणाऱ्या सापांचा लागला शोध, रहस्यमय गुहेत राहतात; जगासमोर पहिल्यांदाच आली नवी प्रजाती
कंबोडियात अलीकडेच जंगलात शेकडो किलोमीटर परिसरात पसरलेल्या गुहा सापडल्या आहेत. या गुहा चुना आणि दगडांनी बांधलेल्या आहेत. वैज्ञानिकांनी जेव्हा या गुहांचे निरीक्षण केले तेव्हा त्यात अशा जीवांचा शोध लागला ज्याच्याबद्दल जगाला अद्याप माहितीच नव्हती. या गुहेत खतरनाक साप, सरडे आणि गोगलगायी सापडल्या आहेत. या सापांमध्ये अशी एक प्रजाती सापडली आहे जी हवेत उडते.
१० डोंगरात ६४ गुहांचा लागला शोध
एका रिपोर्टनुसार, गेल्या २ वर्षांपासून हा शोध सुरू होता. २०२३ ते जुलै २०२५ या काळात कंबोडियातील १० डोंगरांमध्ये ६४ मोठ्या गुहा सापडल्या आहेत. याच गुहांमध्ये हे साप आढळले. हे साप एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी घेतात. त्यांच्या लवचिक हाडांमुळे त्यांना हे करणे शक्य होते. हवेत झेप घेताना ते एका रिबिनीसारखे होतात. ज्यामुळे त्यांना उडणे सोपे होते. विशेष म्हणजे सापांची ही प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. या सापांच्या चमकत्या रंगामुळे त्यांचा अवैध व्यापार होत असल्याचेही समोर आले आहे.
तसेच कंबोडियाच्या या गुहांमध्ये ११ नव्या प्रजाती सापडल्या आहेत. त्यापैकी १ पिट वायपर आहे. त्यांच्या डोक्यात हीट सेंसिटिव्ह ऑर्गन असल्याने त्यांना हे नाव दिले आहे. हा ऑर्गन त्यांना त्यांची शिकार ओळखण्यासाठी आणि त्याचा माग काढण्यासाठी मदत करतो. 'फौना अँड फ्लोरा'नुसार हा अवयव त्यांना उष्णरक्त प्राण्यांची शिकार करण्यास मदत करतो.
प्रत्येक गुहा ही एका बेटावरील लॅबसारखी
ब्रिटिश फ्लोरा अँड फॉना कॉन्झर्वेशन चॅरिटीच्या एका रिपोर्टनुसार कंबोडियातील या गुहा खडकांच्या विघटनाने तयार झालेल्या कार्स्ट भूदृश्याचा भाग आहेत. त्या एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. प्रत्येक गुहा ही एक प्रकारची बेटावरील प्रयोगशाळा असून त्यात विविध प्रकारचे जीव राहत आहेत. या संस्थेने कंबोडियाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या सहकार्याने या गुहांचे सर्वेक्षण केले. जर आपल्याला या ग्रहावरील जैवविविधतेचे खरोखरच संरक्षण करायचे असेल तर येथे काय अस्तित्वात आहे हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे असं अमेरिकेतली बॉयोलॉजिस्ट ली ग्रीसमर यांनी सांगितले.
एकाच गुहेत दहा लाख वटवाघळे राहतात
दरम्यान, अशा काही गुहा देखील आढळल्या, ज्यातील प्रत्येकात दहा लाखांपर्यंत वटवाघळे होती. आत असलेल्या वटवाघळांच्या मोठ्या संख्येने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकल्या असत्या, त्यामुळे संशोधक पथकाला या गुहांमध्ये प्रवेश करता आला नाही. कंबोडियातील या चुनखडीच्या कार्स्ट रचना कंबोडियाच्या एकूण भूभागाच्या सुमारे ९ टक्के क्षेत्र व्यापतात, जे २०,००० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. हा विशाल प्रदेश आतापर्यंत विज्ञानाच्या नजरेस पडला नव्हता.