पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 20:07 IST2026-01-08T20:07:22+5:302026-01-08T20:07:52+5:30
बलूचिस्तान गणराज्यात कायदा आणि सुव्यवस्थेनुसार, ही अटकेची कारवाई बलूचिस्तानच्या कुठल्याही हवाई तळावर त्यांच्या आगमन किंवा प्रस्थानावेळी होऊ शकते असं वॉरंटमध्ये म्हटलं आहे.

पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
इस्लामाबाद - पाकिस्तानात पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याविरोधात त्यांच्याच देशात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील बंडखोर सरकारने जारी केले आहे. त्यात शहबाज शरीफ यांच्यावर बलूचिस्तानातील व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. बलूचिस्तानच्या सार्वभौमत्वाला गंभीर आणि जाणुनबुजून नुकसान पोहचवल्याचा आरोप आहे. शहबाज शरीफ यांच्या अटकेच्या वॉरंटची घोषणा मीर यार बलोच यांनी केली आहे. जे सोशल मीडियावर बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असतात आणि पाकिस्तानी सैन्यावर कायम टीका करत राहतात.
बलोच यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात बलूचिस्तान गणराज्यातील व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी केली आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी जारी या आदेशानुसार, पाकिस्तानी पंतप्रधान बलूचिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला नुकसान पोहचवत आहेत. त्यासाठी त्यांना अटक केली जाऊ शकते. विना व्हिसा बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बलूचिस्तान गणराज्यात कायदा आणि सुव्यवस्थेनुसार, ही अटकेची कारवाई बलूचिस्तानच्या कुठल्याही हवाई तळावर त्यांच्या आगमन किंवा प्रस्थानावेळी होऊ शकते असं वॉरंटमध्ये म्हटलं आहे.
बलूचिस्तानला स्वतंत्र देशाचा दर्जा
बलूचिस्तानचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांनी व्हिसा नसताना बलूचिस्तानात प्रवेश केला तर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल. हे कृत्य बलूचिस्तानमधील प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन ठरेल. त्याशिवाय हवाई क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण आहे. बलूचिस्तान या गोष्टीचा स्पष्ट शब्दात विरोध करते. बलूचिस्तान एक विशिष्ट स्वतंत्र देश आहे. कुणीही व्यक्ती असेल, मग त्याचे पद अथवा प्रतिष्ठा काहीही असेल त्याला बलूचिस्तानच्या कायद्यातून सूट नाही. योग्य कागदपत्रे आणि अधिकृतपणे व्हिसा न घेता बलूचिस्तानमध्ये प्रवेश करणे कायदेशीर गुन्हा आहे असं वॉरंटमध्ये लिहिले आहे.
The Republic of Balochistan issues arrest warrant of Pakistan's PM Shehbaz Sharif over violation of Balochistan's visa rules.
— Mir Yar Baloch (@miryar_baloch) January 8, 2026
8th January 2026
The Prime Minister of Pakistan is liable to arrest by the Republic of Balochistan for grave and deliberate violations of Balochistan’s… pic.twitter.com/v1R9PpkgOo
हे वॉरंट पाकिस्तानचे पंतप्रधान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि सर्व पाकिस्तानी अधिकारी, नागरिकांना अंतिम आणि औपचारिक इशारा आहे. बलुचिस्तान प्रजासत्ताकाने जारी केलेल्या पूर्व व्हिसा मंजुरीशिवाय बलूचिस्तानमध्ये भविष्यात कोणताही प्रवेश सहन केला जाणार नाही. वैध बलुचिस्तान व्हिसा किंवा अधिकृत इमिग्रेशन क्लिअरन्सशिवाय बलूचिस्तानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारा कोणताही पाकिस्तानी नागरिक पकडला गेला तर त्याला बलूचिस्तान प्रजासत्ताकाच्या कायद्यांनुसार कठोर खटला आणि शिक्षेला सामोरे जावे लागेल, त्याला जबरदस्तीने पाकिस्तानात पाठवले जाऊ शकते असं सांगण्यात आले आहे.