रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 09:03 IST2026-01-09T09:02:06+5:302026-01-09T09:03:34+5:30
अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेल्या दिपू या हिंदू तरुणाच्या प्रकरणाने आता संपूर्ण बांगलादेशसह भारतातही संतापाचा वणवा पेटला आहे.

रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. नोकरीच्या वादातून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेल्या दिपू या हिंदू तरुणाच्या प्रकरणाने आता संपूर्ण बांगलादेशसह भारतातही संतापाचा वणवा पेटला आहे. या प्रकरणाच्या तपासात मोठी प्रगती झाली असून, अटकेत असलेल्या १८ आरोपींपैकी ९ जणांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. मात्र, या हत्येमुळे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
दिपू नावाच्या हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दिपूच्या वडिलांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या वैयक्तिक वादातून नसून त्याच्या नोकरीशी संबंधित वादातून झाली होती. दिपूला त्याच्या कामाच्या ठिकाणी वारंवार लक्ष्य केले जात होते आणि अखेर त्याचा जीव घेण्यात आला. या घटनेचे पडसाद भारतातही उमटले असून, शेजारील देशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी भारत सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
९ आरोपींनी कबूल केलं पाप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपू हत्या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची रिमांड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यातील ९ आरोपींनी न्यायाधीशांसमोर आपला गुन्हा कबूल केला असून हत्येचा कट कसा रचला, याची सविस्तर माहिती दिली आहे. याशिवाय, तीन महत्त्वाच्या साक्षीदारांनीही न्यायालयात आपले जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू केली असून, लवकरच सर्व दोषींना जेरबंद केले जाईल, असा दावा केला आहे.
२० दिवसांत ७ हिंदूंच्या हत्या; भीषण वास्तव
दिपूची हत्या ही केवळ एक घटना नाही. गेल्या अवघ्या २० दिवसांत बांगलादेशात तब्बल ७ हिंदूंची हत्या झाली आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे तिथल्या हिंदू समुदायामध्ये दहशतीचे वातावरण आहे. मंदिरे, घरे आणि आता थेट जीवावर उठलेल्या या कट्टरपंथी प्रवृत्तींमुळे जगभरातून बांगलादेश सरकारवर टीका होत आहे.
भारतातून तीव्र प्रतिक्रिया
भारतातील विविध संघटना आणि सामान्य नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सोशल मीडियावर 'जस्टिस फॉर दिपू' मोहीम सुरू झाली असून, बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला जात आहे. भारताने या प्रकरणावर चिंता व्यक्त केली असून अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.