पहलगामऐवजी बलुचिस्तानचे नाव...चीनच्या खेळीनंतर भारताचा निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:54 IST2025-06-26T11:46:53+5:302025-06-26T11:54:59+5:30

चीनमधील एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांनी भारताची भूमिका कमकुवत करू शकणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

Rajnath Singh got angry due to no mention of Pahalgam did not sign the document at SCO summit | पहलगामऐवजी बलुचिस्तानचे नाव...चीनच्या खेळीनंतर भारताचा निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार

पहलगामऐवजी बलुचिस्तानचे नाव...चीनच्या खेळीनंतर भारताचा निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार

Rajnath Singh at Shanghai Cooperation Organisation: शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले. पाकिस्तान आणि चीनसह संपूर्ण जगाला दहशतवादावर कडक इशारा देताना मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनमधील किंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करणाऱ्यांना हल्ल्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं. निवेदनात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख नसल्याने त्यावर सही करण्यास राजनाथ सिंह यांनी नकार दिला.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या चीनमध्ये आहेत. गुरुवारी त्यांनी एससीओ म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केले. यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नसल्याने बैठकीच्या संयुक्त निवेदनावर राजनाथ सिंह यांनी सही केली नाही. हे संयुक्त निवेदन दहशतवादाविरुद्ध भारताची ठाम भूमिका दर्शवत नसल्याचे सांगण्यात आलं. महत्त्वाचे म्हणजे या निवेदनात बलुचिस्तानचा उल्लेख होता आणि भारतावर अशांतता निर्माण करण्याचा आरोप होता. या बैठकीद्वारे चीन आणि पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्द्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र राजनाथ सिंह यांनी बरोबर ओळखून निवदेनावर सही केली नाही.

दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका कमकुवत झाली असती म्हणून राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदन असलेल्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे म्हटलं जात आहे. चीन आणि पाकिस्तानने त्यांच्या प्रभावाने हे निवेदन तयार केल्याचे बोललं जात आहे. चीनने एससीओ शिखर परिषदेचे आयोजन केलं आबे. कोणत्याही निवेदनाचा मसुदा तयार करण्यात यजमान देशाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे पाकिस्तानवरील प्रेमापोटी चीन दहशतवादाचा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न करत होता, जो राजनाथ सिंह यांनी एका क्षणात पकडला.

"दहशतवादासाठी वित्तपुरवठा करणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे आणि त्याविरुद्ध लढताना कोणतेही दुहेरी निकष नसावेत. काही देश दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी सीमापार दहशतवादाचा धोरणात्मक साधन म्हणून वापर करत आहेत. आमच्या प्रदेशातील सर्वात मोठी आव्हाने शांतता, सुरक्षितता आणि विश्वासाचा अभाव आहे आणि या समस्यांचे मूळ कारणे म्हणजे वाढता कट्टरतावाद, अतिरेकीवाद आणि दहशतवाद आहे. शांतता, समृद्धी आणि दहशतवाद एकत्र राहू शकत नाहीत," असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

Web Title: Rajnath Singh got angry due to no mention of Pahalgam did not sign the document at SCO summit