“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:24 IST2025-12-23T13:23:05+5:302025-12-23T13:24:13+5:30
Rahul Gandhi Germany Visit: भारत हा गुंतागुंतीचा पण वैविध्यपूर्ण देश आहे. एका व्यक्तीने त्याचे भविष्य ठरवणे शक्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Rahul Gandhi Germany Visit: भारतात तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही निवडणुका जिंकल्या. महाराष्ट्राच्या निवडणुका निष्पक्ष होत्या, असे मला वाटत नाही. हरयाणात निवडणुका जिंकल्या आहेत. अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन स्पष्टपणे दाखवून दिले आहे की, भारतातील संस्थात्मक चौकटीवर व्यापक हल्ला होत आहे. मला असे वाटते की, भारतातील संस्थांवर तीव्र दबाव आहे. सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर होत आहे, ज्यामुळे लोकशाही संस्था स्वतंत्रपणे काम करण्यापासून रोखले जात आहे, अशी टीका काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. ते जर्मनीत बोलत होते.
भारतात जे घडत आहे ते दोन दृष्टिकोनांमधील संघर्ष आहे. एक दृष्टिकोन भाजप आणि आरएसएस राजवटीवर विश्वास ठेवतो, तर दुसरा यावर विश्वास ठेवतो की, भारतातील शासन हे संवाद, सहमती आणि त्याच्या विविध राज्ये आणि संस्कृतींच्या आधारे केले पाहिजे. भारत हा गुंतागुंतीचा पण वैविध्यपूर्ण देश आहे. एका व्यक्तीने त्याचे भविष्य ठरवणे शक्य नाही. भारताचे संविधानात, राज्यांचे संघ म्हणून अनेक दृष्टिकोन आहेत, जे समजले आणि ऐकले पाहिजेत. परंतु, नवीन मॉडेल म्हणजेच भाजपा सरकार यावर चर्चा करू इच्छित नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
आमचा लढा भाजपाशी नाही, तर...
तुम्ही मोठे उद्योगपती असाल आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत असाल तर, तुम्ही धोक्यात आहात. भाजपा राजकीय सत्ता मिळविण्यासाठी भारताच्या संस्थात्मक रचनेचा वापर करते. भाजपा आणि विरोधी पक्षांकडे असलेल्या पैशातील फरक पाहा. लोकशाही व्यवस्थेवर हल्ला होत आहे. विरोधी पक्ष म्हणून, त्याचा प्रतिकार करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. यशस्वी होणारी विरोधी प्रतिकार प्रणाली निर्माण केली पाहिजे. आमचा लढा भाजपाविरोधात नाही, तर आम्ही भारतीय संस्थात्मक व्यवस्थेवर त्यांनी घेतलेल्या ताब्याविरोधात लढत आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उत्पादन. परंतु भाजपाने अदानी आणि अंबानी सारख्या काही मोठ्या व्यावसायिक गटांच्या हातात सत्ता केंद्रित करून याबाबत प्रतिकूलता निर्माण करत आहेत. हे उत्पादनापेक्षा व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित करतात, असेही राहुल गांधी म्हणाले.