लंडन: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर लवकरच इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर होण्याची शक्यता आहे. राजन यांचं नाव इंग्लंडच्या गव्हर्नर पदाच्या शर्यतीत आहे. बँक ऑफ इंग्लंड ही अतिशय प्रतिष्ठित संस्था मानली जाते. इंग्लंडमधील सर्व बँकांचं नियंत्रण या बँकेकडून केलं जातं. लंडनमधील प्रमुख्य वृत्तपत्र असलेल्या फायनान्शियल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेनं नव्या गव्हर्नरचा शोध सुरू केला आहे. नवे गव्हर्नर पुढील वर्षापासून बँकेची सूत्रं हाती घेतील. सध्या मार्क कार्ने इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहात आहेत. त्यांचा कार्यकाळ जून 2019 ला संपेल. कार्ने यांनी 2013 मध्ये मध्यवर्ती बँकेची धुरा खांद्यावर घेतली होती. कार्ने यांच्या निमित्तानं गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच बँकेची जबाबदारी परदेशातील व्यक्तीकडे गेली. इंग्लंडचे अर्थमंत्री फिलिप हेमंड यांनी गव्हर्नरपदावर नव्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचे संकेत दिले आहेत. कार्ने यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असून ती व्यक्ती परदेशीही असू शकते, असं हेमंड यांनी म्हटलं आहे. बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी रघुराम राजन यांच्यासोबतच मूळचे भारतीय असलेल्या सृष्टी वाडेरादेखील शर्यतीत आहेत. मेक्सिकोच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सचे नवे व्यवस्थापक ऑस्टिन कार्स्टन्स यांच्याऐवजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना बँक ऑफ इंग्लंडची जबाबदारी दिली जाऊ शकते, असं फायनान्शियल टाईम्सनं एका लेखात म्हटलं आहे.
रघुराम राजन पुन्हा गव्हर्नर होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 17:17 IST