Putin: रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुतिन सकारात्मक; पण झेलेन्स्कींसमोर ठेवली 'अशी' अट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:35 IST2025-11-28T11:33:47+5:302025-11-28T11:35:01+5:30
Russia-Ukraine War: रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुतिन यांनी वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासमोर महत्त्वाची अट ठेवली आहे.

Putin: रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुतिन सकारात्मक; पण झेलेन्स्कींसमोर ठेवली 'अशी' अट!
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ पुढील आठवड्यात मॉस्कोला भेट देणार आहेत. त्यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले. शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवताना पुतिन यांनी युक्रेनसमोर एक महत्त्वाची अट ठेवली आहे.
सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असलेले पुतिन यांनी बिश्केकमधील एका कार्यक्रमात म्हटले आहे की, "अमेरिका रशियाची भूमिका विचारात घेत आहे. परंतु काही मुद्द्यांवर अजूनही चर्चा होणे आवश्यक आहे. जर युरोपला रशियाकडून असे आश्वासन हवे असेल की, ते त्यांच्यावर हल्ला करणार नाहीत, तर रशिया असे आश्वासन देण्यास तयार आहे. परंतु, युक्रेनियन सैन्याने ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून माघार घेतली पाहिजे आणि मग ही लढाई थांबेल. जर त्यांनी माघार घेतली नाही, तर आम्ही सशस्त्र मार्गांनी हे साध्य करू." रशियाने युक्रेनच्या सुमारे २० टक्के भूभागावर कब्जा केला आहे, यामध्ये लुहान्स्क, डोनेत्स्क, खेरसन आणि झापोरिझ्झियाचा काही भाग समाविष्ट आहे. सध्या रशियन सैन्य पोकरोव्स्क क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पुढे जात आहे.
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने एक महत्त्वाकांक्षी शांतता योजना तयार केली. या योजनेनुसार, युक्रेनला आपला सुमारे २० टक्के भूभाग रशियाला सोपवावा लागेल, यात पूर्व युक्रेनमधील विवादास्पद डोनबास प्रदेशाचा समावेश आहे. शिवाय, युक्रेन केवळ ६ लाख सैनिकांचीच सेना ठेवू शकेल, युक्रेन नाटो मध्ये सामील होणार नाही, तसेच नाटोचे सैन्य युक्रेनच्या भूमीवर राहणार नाही, डोनबास प्रदेश रशियाला सोपवल्यानंतर लढाई थांबवावी लागेल आणि युद्धबंदी लागू करावी लागेल, युद्धबंदी लागू झाल्यानंतर १०० दिवसांच्या आत युक्रेनमध्ये राष्ट्रपती निवडणुका घ्याव्या लागतील, रशियाने शांतता प्रस्तावांचे पालन केल्यास, त्याच्यावरील सर्व आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवले जातील, अशा एकूण २८ मुद्द्यांचा शांतता योजनेत समावेश करण्यात आला आहे.
ट्रम्प प्रशासनाची ही योजना इस्रायल-गाझा येथील शांतता योजनेने प्रेरित असल्याचे मानले जात आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी ही योजना दोन्ही पक्षांकडून माहिती घेऊन तयार केल्याचे म्हटले असले, तरी युक्रेनियन अधिकाऱ्यांनी मात्र त्यांना यात समाविष्ट केले गेले नसल्याचा दावा केला. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्त्ज यांनी एकत्रितपणे जाहीर केले की, त्यांचे देश युक्रेनसोबत ठामपणे उभे आहेत.