"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 15:42 IST2025-10-05T15:40:26+5:302025-10-05T15:42:25+5:30
what happened to Greta Thunberg Israel: पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गला इस्रायलच्या लष्कराने ताब्यात घेतले होते. गाझा पट्टीत मदत घेऊन जात असताना इस्रायलने ही कारवाई केली. पण, ताब्यात घेतल्यानंतर इस्रायली सैन्याकडून अमानुष वागणूक देण्यात आल्याचा करण्यात आला आहे.

"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
Greta Thunberg Israel News: स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गसोबत अमानुष वागणूक करण्यात आल्याचा आरोप इस्रायलवर करण्यात आला आहे. ग्रेटा थनबर्गचे केस ओढण्यात आले. तिला बळजबरी इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावले गेले. इस्रायलने ताब्यात घेतलेल्या आणि नंतर टर्कीला पाठवण्यात आलेल्या सोबतच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा आरोप केला आहे. आमच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलं असून, आम्हाला ना चांगलं जेवण दिलं गेलं, ना पाणी, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान इस्रायलने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
युद्धाच्या आगीत होरपळत असलेल्या गाझा पट्टीत औषधी आणि खाद्यपदार्थ घेऊन ग्रेटा थनबर्ग आणि सामाजिक कार्यकर्ते जहाजाने जात होते. इस्रायलच्या सैन्याने त्यांची जहाजे समुद्रातच रोखली आणि सगळ्यांना ताब्यात घेतले. यापैकी १३७ सामाजिक कार्यकर्त्यांना शनिवारी इस्तंबूलमध्ये पाठवण्यात आले. टर्कीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली.
३६ टर्की कार्यकर्त्यांचा समावेश
१३७ जणांच्या गटात ३६ नागरिक टर्कीचे आहेत. तर इतर अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, अल्जेरिया, मोराक्को, इटली, कुवैत, लिबिया, मलेशिया, मॉरिशिस, स्वीत्झर्लंड, ट्युनिशिया आणि जॉर्डन येथील आहेत.
मलेशियाचे हझवानी हेल्मी आणि अमेरिकेच्या विंडफेल्ड बीव्हर यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांनी (इस्रायल) थनबर्गला अतिशय वाईट वागणूक दिली. ती एक मोठी आपत्तीच होती. त्यांनी आम्हाला जनावरांप्रमाणेच वागणूक दिली. ग्रेटा थनबर्गला इस्रायली ध्वज अंगावर घेण्यास भाग पाडलं गेलं.
इस्रायली जवान हालचाल केली की मारायचे
२८ वर्षीय हेल्मी यांनी सांगितलं की, इस्रायली सैन्याने ताब्यात घेतलेल्या लोकांना चांगले जेवण दिले नाही. पिण्याचे पाणीही चांगले दिले नाही. आम्ही सोबत घेऊन गेलेलो सर्व औषधी त्यांनी जप्त केली.
इटलीच्या पाओलो रोमनो यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, "त्यांनी आम्हाला बळजबरी गुडघ्यांवर बसवले. आम्हाला डोकं जमिनीवर ठेवायला लावले. आम्ही हालचाल केली की ते आम्हाला पाठीमागून मारत. आम्हाला मारल्यावर ते हसायचे. आमच्यावर मानसिक आणि शारीरिक हिंसा केली.
इस्रायलने सर्व आरोप फेटाळले
ग्रेटा थनबर्गबद्दल तिच्या सोबतच्या लोकांनी जे आरोप केले ते इस्रायलने फेटाळून लावले आहेत. ग्रेटा थनबर्गला वाईट वागणूक दिल्याचे दावे दिशाभूल करणार आहेत. ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्तींच्या कायदेशीर हक्कांचे पालन केले गेले. महत्त्वाचे म्हणजे ग्रेटा थनबर्गने आणि तिच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना परत पाठवण्याचा प्रस्ताव नाकारला आणि कोठडीत राहण्यावरच ठाम आहेत. ग्रेटा थनबर्गने इस्रायली अधिकाऱ्यांशी याबद्दल कोणतीही तक्रार केलेली नाही, असे खुलासा इस्रायलच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केला आहे.