नेपाळ पेटले! हिंदूराष्ट्र आणि राजेशाहीच्या मागणीसाठी आंदोलन, रॅलीत झळकले CM योगींचे पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:37 IST2025-03-28T19:37:36+5:302025-03-28T19:37:52+5:30

Massive Protest in Nepal: बांग्लादेशाप्रमाणे नेपाळमध्ये सरकारविरोधात हिंसक आंदोलन पेटले आहे.

Protest in Nepal: Protest demanding Hindu nation and monarchy | नेपाळ पेटले! हिंदूराष्ट्र आणि राजेशाहीच्या मागणीसाठी आंदोलन, रॅलीत झळकले CM योगींचे पोस्टर

नेपाळ पेटले! हिंदूराष्ट्र आणि राजेशाहीच्या मागणीसाठी आंदोलन, रॅलीत झळकले CM योगींचे पोस्टर

Massive Protest in Nepal: भारताचा शेजारील देश नेपाळमध्येही बांग्लादेशाप्रमाणे सरकारविरोधात हिंसक आंदोलन आणि जाळपोळीची घटना घडली आहे. राजेशाही आणि हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी शुक्रवारी(28 मार्च) राजधानी काठमांडूमध्ये सुरक्षा दल आणि राजेशाही समर्थकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. आंदोलकांनी अनेक घरे, इमारती आणि वाहनांना आग लावली, याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या.

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, सुरुवातीला शांततापूर्ण आंदोलन सुरू होते, पण अचानक आंदोलकांनी पोलीस बॅरिकेडिंग हटवल्यामुळे वाद वाढला आणि या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. यावेळी पोलिस आणि हजारो आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष झाला. हिंसक निदर्शनांनंतर नेपाळच्या गृहमंत्रालयाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तिनकुणे, सिनामंगल आणि कोटेश्वर भागात संचारबंदी लागू केली आहे. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नेपाळी लष्कराला रस्त्यावर उतरवण्यात आले आहे. 

रॅलीत योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर
राजेशाही समर्थकांच्या रॅलीत नेपाळला हिंदू राष्ट्र करण्याची मागणी करण्यात आली. या रॅलीत आंदोलकांच्या हातात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एक मोठे पोस्टरही दिसले, ज्यामध्ये त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक दाखवण्यात आले होते.

हिंसाचार कसा झाला?
सकाळपासून संयुक्त आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. आंदोलक तिनकुणे परिसरात जमा झाले, मात्र गर्दी वाढल्याने परिस्थिती बिघडू लागली. आंदोलकांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडून त्या पेटवून दिल्या. सुरक्षा कठडा तोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली. आंदोलकांनी सुरक्षा घेरा तोडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा फोडल्या. 

संयुक्त आंदोलन समिती आणि राजकीय पाठबळ
नवराज सुबेदी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आंदोलन समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला वादग्रस्त व्यापारी दुर्गा प्रसादी आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे नेते राजेंद्र लिंगदेन यांनी पाठिंबा दिला होता. नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र आणि घटनात्मक राजेशाहीत रूपांतरित करावे, अशी समितीची मागणी आहे. अनेक उजव्या विचारसरणीचे गट या चळवळीला पाठिंबा देत आहेत. नेपाळच्या सेक्युलर होण्याच्या निर्णयावर काही वर्ग नाराज आहेत.

राजेशाहीची मागणी का वाढत आहे?
2008 मध्ये नेपाळला संवैधानिक राजेशाहीतून काढून धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित करण्यात आले होते, परंतु काही कट्टरवादी गट आणि हिंदू संघटनांचे असे मत आहे की, नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र बनवले पाहिजे. समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की, नेपाळची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख वाचवण्यासाठी राजेशाही आवश्यक आहे. जनता धर्मनिरपेक्ष सरकारवर खूश नाही. तर, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही नेपाळची नवी ओळख बनल्याचा युक्तिवाद विरोधकांनी केला आहे. 

Web Title: Protest in Nepal: Protest demanding Hindu nation and monarchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.