प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:40 IST2025-10-09T06:40:17+5:302025-10-09T06:40:25+5:30
रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने हा निर्णय जाहीर केला. त्यांचे संशोधन पाण्याची कमतरता, हवामान बदल व औद्योगिक प्रदूषणाशी लढण्यासाठी गेम-चेंजर ठरू शकते.

प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार
स्टॉकहोम : यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जपानचे प्रा. सुसुमु कितागावा, ऑस्ट्रेलियाचे प्रा. रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेचे प्रा. ओमर एम. याघी यांना जाहीर झाला आहे. या तिघा वैज्ञानिकांनी मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स (एमओएफस) क्रांतिकारी संकल्पनेवर काम करून रसायनशास्त्राला नवे वळण दिले आहे. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने हा निर्णय जाहीर केला. त्यांचे संशोधन पाण्याची कमतरता, हवामान बदल व औद्योगिक प्रदूषणाशी लढण्यासाठी गेम-चेंजर ठरू शकते.
ओमर याघी (अमेरिका) : त्यांनी १९९५ मध्ये ‘मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क’ हा शब्द वापरला आणि १९९९ मध्ये मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स’ तयार केले. त्यांनी वाळवंटातील हवेतून पाणी खेचून साठवण्याचे प्रयोग यशस्वी केले.
सुसुमु कितागावा (जपान) : १९९७ मध्ये त्यांनी पहिले स्थिर मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स’ तयार केले. त्यात मिथेन, ऑक्सिजनसारखे गॅस सहज भरणे-रिकामे करणे शक्य होत असे. त्यांनी या पदार्थांना ‘सॉफ्ट मटेरियल्स’ची संकल्पना दिली.
रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) : १९८०च्या दशकाच्या अखेरीस त्यांनी तांबे आयन व कार्बनिक अणूंना जोडून अशा नवीन आण्विक रचनांची निर्मिती केली. हेच आधुनिक मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क संशोधनाचे बीज ठरले.
‘मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स’?
‘मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स’ म्हणजे अशा आण्विक संरचना ज्या घनरूप असूनही त्यांच्या आत सूक्ष्म पोकळ्या असतात. या पोकळ्यांमधून गॅस किंवा इतर रसायने सहज जाऊ शकतात. अणू आणि रेणूंना विटांसारखे वापरून तयार केलेल्या या मॉलिक्युलर आर्किटेक्चरला भविष्यातील टिकाऊ तंत्रज्ञानाचा पाया मानले जात आहे.
उपयोग- वाळवंटातील हवेतून पाणी काढणे
हवेतली कार्बन डायऑक्साइड किंवा इतर विषारी वायू शोषून घेणे ग्रीन हायड्रोजन, मीथेन यांसारख्या गॅसचे सुरक्षित साठवण
फळे लवकर न पिकता दीर्घकाळ टिकण्यासाठी एथिलीन गॅस रोखणे