पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान; हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 21:11 IST2025-03-11T21:11:09+5:302025-03-11T21:11:55+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा 21वा अंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

Prime Minister Narendra Modi conferred with Mauritius' highest civilian honour ; first Indian to receive this award | पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान; हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान; हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पीएम मोदी सध्या मॉरिशसच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान तेथील पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मंगळवारी(11 मार्च) पंतप्रधान मोदींचा मॉरिशसच्या सर्वोच्च 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत. पोर्ट लुईस येथे भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमात रामगुलाम यांनी ही घोषणा केली.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान त्यांनी मॉरिशसचे अध्यक्ष धरमबीर गोखुळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींसमोर अनेक गोष्टी मांडल्या, ज्यात महाकुंभातील संगम पाणी आणि सुपर फूड मखाना यांचाही समावेश आहे. याशिवाय गोखुळ यांच्या पत्नी वृंदा गोखुळ यांना पंतप्रधानांनी बनारसी सिल्कची साडी भेट दिली आहे.

द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यावर चर्चा
मॉरिशसच्या प्रमुखांची भेट घेतल्यानंतर पीएम मोदींनी X वर लिहिले, 'राष्ट्रपती धरमबीर गोखुळ यांच्यासोबत खूप चांगली भेट झाली. त्यांना भारताची आणि भारतीय संस्कृतीची चांगलीच ओळख आहे. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार. आम्ही विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांना अधिक प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा केली.'

दुसऱ्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, 'मॉरिशसच्या स्टेट हाऊसमध्ये आयुर्वेदिक उद्यान तयार केले गेले हे कौतुकास्पद आहे. मॉरिशसमध्ये आयुर्वेदाची लोकप्रियता वाढत आहे, याचाही मला आनंद आहे. अध्यक्ष धर्मबीर गोखुळ आणि मी आयुर्वेदिक गार्डनला भेट दिली, ज्यामुळे मला ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.'

पंतप्रधान मोदी 10 वर्षांनी मॉरिशसला पोहोचले
PM मोदी 10 वर्षांनंतर मॉरिशसला गेले आहेत. याआधी पंतप्रधान मोदींनी मार्च 2015 मध्ये मॉरिशसला भेट दिली होती. त्यावेळीही पंतप्रधान मोदी राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान, मॉरिशस आणि भारत यांचे जुने नाते आहे. तेथील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.

 

Web Title: Prime Minister Narendra Modi conferred with Mauritius' highest civilian honour ; first Indian to receive this award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.