भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 22:09 IST2025-08-16T22:05:48+5:302025-08-16T22:09:42+5:30
चीनने तिसरी हँगोर क्लास पाणबुडी पाकिस्तानला दिली. ही आठ पाणबुड्यांपैकी एक आहे.

भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात कर लादण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे, चीनने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला. आधीच पाकिस्तानच्या जवळचा चीन असल्याचे मानले जाते, त्यामुळे चीनची मैत्री फक्त दिखावा असू शकते अशा चर्चा सुरू होत्या. आता एक मोठी माहिती समोर आली आहे. चीनने पाकिस्तानला तिसरी आधुनिक हँगोर क्लास पाणबुडी सोपवली. चीनने पाकिस्तानला दिलेल्या आठ हँगोर क्लास पाणबुडींपैकी ही तिसरी आहे. या पाणबुड्या देऊन चीन हिंद महासागरात पाकिस्तानच्या नौदलाला बळकट करत आहे.
हँगोर क्लास पाणबुडी पाकिस्तानला देण्याचा समारंभ गुरुवारी मध्य चीनच्या वुहान शहरात पार पडला. या वर्गातील दुसरी पाणबुडी चीनने या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानला दिली होती. या पाणबुड्या गेल्या काही वर्षांत चीनने पाकिस्तानी नौदलाला दिलेल्या चार आधुनिक फ्रिगेट्स व्यतिरिक्त आहेत.
अरबी समुद्रात पाकिस्तानी सैन्याची ताकद वाढणार
या फ्रिगेट्समुळे अरबी समुद्रात पाकिस्तानी नौदलाला बळकटी मिळाली. यामुळे ग्वादर बंदराभोवती आणि हिंदी महासागरात पाकिस्तानची ताकद वाढली आहे. वुहानमध्ये झालेल्या समारंभात पाकिस्तानी नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल अब्दुल समद म्हणाले, "हँगोर क्लास पाणबुडी आधुनिक युद्ध सुविधा आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे. यामुळे पाकिस्तानची सागरी सुरक्षा आणि स्थिरता आणखी मजबूत होण्यास मदत होईल."