BRICS नष्ट करण्याची तयारी; अमेरिकेला का हवे 'या' 5 देशांवर नियंत्रण? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:51 IST2026-01-05T18:50:09+5:302026-01-05T18:51:28+5:30
व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्पचे आक्रमक धोरण; ‘मोनरो सिद्धांत’ची पुनरावृत्ती?

BRICS नष्ट करण्याची तयारी; अमेरिकेला का हवे 'या' 5 देशांवर नियंत्रण? जाणून घ्या...
अमेरिकेच्या व्हेनेजुएलामधील लष्करी कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी पाच देशांविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. ग्रीनलँड, क्यूबा, कोलंबिया, मेक्सिको आणि इराण हे देश आता अमेरिकेच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले असून, याला 19व्या शतकातील मोनरो सिद्धांताची (Monroe Doctrine) पुनरावृत्ती म्हणून पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर BRICS मधील अनेक देशांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, जागतिक शक्ती-संतुलन बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्हेनेझुएलावर अमेरिकेची कारवाई
अमेरिकेने 3 जानेवारी 2026 रोजी व्हेनेझुएलावर हल्ला करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करून अमेरिकेत नेले. हा हल्ला अनेक महिन्यांच्या नियोजनानंतर करण्यात आला. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, व्हेनेझुएलामध्ये नवीन सरकार स्थापन होईपर्यंत अमेरिका तेथे नियंत्रण ठेवणार आहे.
अमेरिकेच्या निशाण्यावर असलेले पाच देश
1. कोलंबिया
ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेत्रो यांच्यावर टीका करत त्यांना “आजारी माणूस” म्हटले होते. कोलंबियातही व्हेनेझुएलासारखी कारवाई होईल का, या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, “मला ही कल्पना चांगली वाटते.”
2. क्यूबा
व्हेनेझुएलातील कारवाईदरम्यान 32 क्यूबन सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला. अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी क्यूबाची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. मात्र ट्रम्प म्हणाले, “क्यूबा आपोआप कोसळेल; लष्करी कारवाईची गरज भासणार नाही.”
3. ग्रीनलँड
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेला राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँड हवे असल्याचे म्हटले. ग्रीनलँडच्या किनाऱ्यावर रशियन आणि चिनी जहाजे फिरत असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र डेन्मार्कने याला तीव्र विरोध दर्शवला.
4. इराण
इराणमध्ये महागाई आणि आर्थिक संकटामुळे सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला की, “जर आंदोलकांवर हिंसा झाली, तर अमेरिका कठोर कारवाईसाठी तयार आहे.”
5. मेक्सिको
ट्रम्प यांनी मेक्सिकोला ड्रग्स तस्करी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. त्यांनी मेक्सिकोला अनेकदा अमेरिकी लष्करी मदतीची ऑफर दिल्याचे सांगितले, मात्र राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबाम यांना “चांगली व्यक्ती” असेही संबोधले.
BRICS देशांची प्रतिक्रिया
व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर BRICS देशांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. लुला दा सिल्वा यांनी हा हल्ला “लॅटिन अमेरिकेतील सर्वात वाईट हस्तक्षेप” असल्याचे म्हटले. तर, रशियाने याला सशस्त्र आक्रमकता ठरवले. याशिवाय, चीनने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आणि भारताने यावर गंभीर चिंता व्यक्त करत शांततापूर्ण तोडग्याचे आवाहन केले.
अमेरिकेला काय साध्य करायचे आहे?
विश्लेषकांच्या मते, व्हेनेझुएलावर नियंत्रण मिळाल्यास जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यावर अमेरिकेचा प्रभाव वाढेल. ग्रीनलँडमुळे आर्क्टिक क्षेत्रावर वर्चस्व मिळेल. इराणवर दबाव टाकल्यास मध्यपूर्वेतील महत्त्वाच्या समुद्री मार्गांवर नियंत्रण मिळू शकते. क्यूबा आणि कोलंबियामुळे लॅटिन अमेरिका व कॅरिबियन भागात चीन-रशियाचा प्रभाव कमी करता येईल.
मोनरो सिद्धांताची पुनरावृत्ती?
ट्रम्प यांनी 1823 मध्ये माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेम्स मोनरो यांनी मांडलेल्या मोनरो सिद्धांताचा उल्लेख करत पश्चिमी गोलार्धाला अमेरिकेचे प्रभावक्षेत्र मानण्याची भूमिका पुन्हा मांडली आहे. यामुळे BRICSसारख्या संघटनांची ताकद कमी होऊन, अमेरिका-केंद्रित जागतिक व्यवस्था पुन्हा उभी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प यांच्या या आक्रमक धोरणामुळे जागतिक राजकारणातील समीकरणे झपाट्याने बदलू शकतात. पुढील काही महिन्यांत अमेरिका, BRICS आणि इतर जागतिक शक्तींमधील संघर्षाचे स्वरूप कसे राहते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.